आम आदमी पार्टी सहा राज्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत

January 28,2021

नवी दिल्ली : २८ जानेवारी - दिल्लीत निर्विवादपणे सत्ता काबीज केल्यानंतर आप आदमी पक्षाने पंख फैलावण्यास सुरू केली आहे. राष्ट्रीय राजकारणात अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी याची आज घोषणा केली. आगामी दोन वर्षात सहा राज्यात विधानसभा निवडणुका होत असून, आप या निवडणूका लढवणार आहे.

दिल्लीतील राजकारणात पाय रोवल्यानंतर आम आदमी पार्टीनं देशाच्या राजकारणात पाऊल ठेवण्यास सुरू केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील दोन वर्षात सहा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय आपने घेतला असून, मुख्यमंत्री व आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी याची घोषणा केली. आप उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे या सहा राज्यातील निवडणुकीत आणखी रंगत वाढणार आहे.

कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना केजरीवाल म्हणाले,”देशातील शेतकरी दुःखी आहे. मागील २५ वर्षांमध्ये साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नवीन कृषी कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून जमीन हिरावून घेऊन भांडवलदारांना देण्याची तयारी सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचार दुर्दैवी आहे असून, शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत,” असं केजरीवाल यांनी सांगितलं.