पालघर जिल्ह्यात बनावट नोटांचा कारखाना केला उध्वस्त

January 28,2021

पालघर : २८ जानेवारी - पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या घाटकोपर युनिटने (युनिट-७) मोठी कारवाई करत बनावट नोटांचा छापखाना उध्वस्त केला आहे.या कारवाईत पोलिसांनी 35 लाखाहून अधिक बनावट नोटा जप्त केल्या आहेत. बनावट नोटा तयार करून त्या बाजारात चलनात आणणाऱ्या टोळीतील अब्दुल्ला कल्लू खान, महेंद्र तुकाराम खंडास्कर, अमीन उस्मान शेख, फारुख रसुल चौधरी अशा चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना बुधवार ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वाडा परिसरात हे आरोपी राहत असून तेथेच त्यांनी बनावट नोटा बनविण्याचा गोरखधंदा सुरू ठेवला होता. मुंबई शहरात ही टोळी बनावट नोटांची विक्री करीत होते.  गुन्हे शाखेने हाती घेतलेल्या विशेष मोहीमेदरम्यान हे घबाड उघड झाले आहे. घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मस्तूद, महेंद्र दोरकर, आनंद बागडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिपीन सावंत व कर्मचाऱ्यांनी या टोळीचा पर्दाफार्षं केला.

मंगळवारी या टोळीतील अब्दुल्ला खान आणि महेंद्र खंडास्कर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ८० हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या.पुढे पोलिसांनी त्यांची खोलात  चौकशी केली असता त्यांनी व त्याच्या इतर सहकाऱ्यांनी बनावट नोटांचा काळाबाजार केल्याची कबुली दिली. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील राहत्या घरी या बनावट नोटांची छपाई केल्याची माहिती या आरोपीनी आपल्या कबुली जबाबात सांगितल्यानंतर पोलिसांनी वाडा येथून अमीन शेख व फारुख चौधरी यांना ताब्यात घेतले. या दोघांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा तसेच बनावट नोटांच्या छपाईसाठी लागणारे प्रिंटर, स्कॅनर, पेपर, इंक बॉटल आदी मुद्देमाल जप्त केला आहे. चारही आरोपींकडून सहा लाख वीस हजार रुपयांच्या दोनशेच्या ३१० नोटा, एकवीस लाख आठ हजार पाचशे रुपयांच्या पाचशेच्या ४ हजार २१७ नोटा, चार लाख पंचावन्न हजार दोनशे रुपयांच्या दोनशेच्या २ हजार २७६ नोटा आणि तीन लाख सत्तर हजार शंभर रुपयांच्या शंभरच्या ३७०३ बनावट नोटा जप्त केल्या. या प्रकरणात आणखीन काही जण असल्याचा संशय व्यक्त होत आहे.