माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी स्थापन केले अण्णासाहेब पाटील फाउंडेशन

January 28,2021

सातारा : २८ जानेवारी - अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आल्यानंतर आता माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या निमित्ताने साताऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी बोलाताना आमदार शिवेंद्रराजेंनी मराठा आरक्षणाचे नेतृत्व उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या हाती द्यावं असं मत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे होते.

या प्रसंगी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील म्हणाले की, "मराठा आणि माथाडी कामगारांची चळवळ वडिलांच्या सातारा जिल्ह्यातून व्हावी म्हणून या सोहळ्याचं आयोजन साताऱ्यात करण्यात आलं आहे. आता मराठा समाजासाठी एकत्र यायची वेळ आली आहे, म्हणून मी तीन राजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. उदयनराजे मराठा आरक्षणाचा मुद्दा हातात घेऊन रस्त्यावर उतरतील त्यावेळी सरकारला पाळायला जागा मिळणार नाही."

अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनबद्दल बोलताना नरेंद्र पाटील यांनी सांगितलं की या फाउंडेशनच्या माध्यमातून एक लाख तरुणांना नोकरी देण्याचं काम केलं जाणार आहे. सरकारने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकासमंडळाला पैसे द्यावेत अशीही मागणी करताना नरेंद्र पाटील म्हणाले की, बँकांनी विश्वास ठेवून कर्ज दिल आहे, मराठा तरुण अडचणीत येऊ नये, नाहीतर माझ्याशी दोन हात करावे लागतील."

नरेंद्र पाटील पुढे म्हणाले की, "आर्थिक मुद्द्यावरून आरक्षण मिळालं तर ग्रामीण भागातील मराठा समाज मागे राहणार नाही. आण्णासाहेब विकास महामंडळात अध्यक्ष या नात्याने मी चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. आता पद नसताना देखील आजही मराठा समाजाला मदत करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. एखाद्या पक्षाशी जोडलो गेलो की समाजासाठी काम करु शकत नाही. त्यामुळे मराठा समाजासाठी काम करताना राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करायचं आहे."

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील म्हणाले की, "महाराजांचे मावळे बनून आम्ही काम करायला तयार आहे. सत्ता आली आणि मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलं जातं. सत्तेचा माज येऊ देऊ नका. आयुष्यभर कोणी सत्तेत राहत नाहीत. उदयनराजे यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला. मराठा समाजातील नेत्यांनी थोडं पक्ष बाजूला ठेवून काम केलं पाहिजे. मराठा समाज जेवढं डोक्यावर घेऊन नाचतो तेवढं खाली पाडून तुडवतो.