औषध निर्मिती केंद्राला आग लागून करोडोची औषधे भस्मसात

January 28,2021

ठाणे : २८ जानेवारी - डोंबिवली एमआयडीसीमध्ये मानवी औषधावर संशोधन करणाऱ्या एका सेंटरला बुधवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवळपास अग्निशमन दलाचे 5 घटनास्थळी दाखल झाले होते. मध्यरात्री उशिरा ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत या आगीत करोडो रुपयांचा माल भस्मसात झाला होता. या दुर्घटनेत 38 संशोधक थोडक्यात बचावले. 

डोंबिवली एमआयडीसी फेज 1 मधील ए 37/38 या ठिकाणी कॅलेक्स फार्मस्यूटीकल रिसर्च सेंटर या मानवी औषध बनण्याच्या आधी तयार होणाऱ्या औषधावर संशोधन करणारे सेंटर आहे. तीन मजली असलेल्या या सेंटरमध्ये एकाच शिफ्टमध्ये संशोधक काम करतात. सकाळची शिफ्ट संपल्यानंतर या शिफ्टमध्ये काम करणारे 38 संशोधक साडेपाच वाजता बाहेर पडले. इतक्यात तिसऱ्या मजल्यावर आग लागली. या मजल्यावर यूपीएस, बॅटरी बॅकअप आणि सर्व्हर रूममध्ये शॉर्टसर्किट झाले. भडकलेली आग पसरत खालच्या सर्व मजल्यांवर पोहोचली. या संदर्भात सेंटरचे मालक रोहिदास सानप यांना विचारले असता ते म्हणाले, 'ही कंपनी आर अँड डी अर्थात रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर आहे. अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन रेडियन्स म्हणजेच मानवी औषधासाठी बनणाऱ्या कॅप्सूलसाठी लागणारा फॉर्म्युला या सेंटरमध्ये तयार करण्यात येतो.' 

15 ते 20 करोड रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा

सेंटरमध्ये 5.20 वाजता इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत 3 मजली तिसऱ्या मजल्यावरील यूपीएस, बॅटरी बॅकअप आणि सर्व्हर रूम जळून खाक झाला. ही आग तळमजल्यावर असलेल्या पॅनलबोर्डपर्यंत आली. त्यामुळेच आगीने संपूर्ण सेंटरला गिळंकृत केले होते. सेंटरमध्ये एकूण 38 तज्ञ संशोधक काम करत होते. 5.30 वाजता ही शिफ्ट संपते. त्यामुळे संशोधक बाहेर आले होते. या आगीत जवळपास 15 ते 20 करोड रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा रोहिदास सानप यांनी केला.

सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी

विशेष म्हणजे मानवी औषध बनविण्याआधी तयार करण्यात येणाऱ्या केमिकलवर संशोधन करणारे भारतातील हे पहिले रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर आहे. या कंपनीत जर्मन टेक्नॉलॉजी वापरण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. तर सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.