भाजपच्या संकेतस्थळावर चुकीचा उल्लेख केल्याप्रकरणी खासदार रक्षा खडसे नाराज

January 28,2021

जळगाव : २८ जानेवारी -  भाजपच्या रावेरच्या खासदार आणि रक्षा खडसे  यांच्या नावाचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख समोर आल्यामुळे खळबळ उडाली होती. अखेर भाजपकडून नावात तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे. परंतु, एक महिलेबद्दलचा असा स्क्रीन शॉट व्हायरल करायला नको हवा होता, अशी तीव्र नाराजी रक्षा खडसे यांनी व्यक्त केली.

रक्षा खडसे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आलेल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपच्या संकेतस्थळावर झालेल्या चुकीच्या प्रकाराबाबत आपले मत मांडले.

'झालेला प्रकार हा वाईट आणि विचित्र होता. एका महिलेच्या संदर्भात कुणी विरोधक किंवा सत्ताधारी असेल अथवा तिथे कुणीही असेल त्यांनी हे व्हायरल करण्याची कोणतीही गरज नव्हती. एका महिला म्हणून एक खासदारावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला आहे. त्यामुळे दु:ख वाटले' अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

'या प्रकरणावर पोलीस चौकशी करत आहे, पक्ष सुद्धा यावर खुलासा करणार आहे. जे कोणी दोषी असतील त्यावर नक्की कारवाई केली पाहिजे, असंही रक्षा खडसे म्हणाल्या.

भाजपच्या वेबसाईटवर हे दिसले आहे, मग चुकू कुणाची असावी? असं विचारले असता रक्षा खडसे म्हणाल्या की, 'जेव्ही मी पाहिलं त्यावेळी मला असं काही दिसलं नाही. त्यावेळी ते रावेरचं होतं. पण काही जणांचं म्हणणं होतं की रावेरचं हिंदी ट्रान्सलेट केल्यावर तसा शब्द वापरला गेला.'

'ही बातमी पाहिल्यानंतर मी भाजपची अधिकृत वेबसाईट चेक केली होती. त्यावेळी मला असं काही दिसलं नाही.  पण काही जणांनी पेजचे स्क्रिन शॉट काढून फोटोशॉपने केले असले, असा माझा अंदाज आहे' असंही रक्षा खडसे म्हणाल्या.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रक्षा खडसे यांच्या मतदार संघाचा चुकीचा उल्लेख केल्यामुळे भाजपला तातडीने हटवण्याची विनंती केली होती. तसंच या प्रकरणी कारवाईचा इशारा सुद्धा दिला होता.