गोरेवाडा प्रकल्पाला बाळासाहेबांचे नाव देऊन त्यांच्या आत्म्यालाही तृप्ती मिळणार नाही - श्रीहरी अणे

January 28,2021

नागपूर : २८ जानेवारी - “नागपुरातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं आहे. यामुळे बाळासाहेबांच्या आत्म्यालाही तृप्ती मिळणार नाही. विदर्भात शिवसेना आपले पाय रोवू शकत नाही, त्यामुळे हे नाव देण्यात आलं आहे, याचा काहीही फायदा शिवसेनेला होणार नाही” अशी टीका ज्येष्ठ विधीज्ञ श्रीहरी अणे  यांनी केली. 

नुकतंच प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपुरातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं. मात्र याला विदर्भवाद्यांनी विरोध केला आहे. त्यावर विधीज्ञ श्रीहरी अणे यांनीही टीकास्त्र सोडलं.

“गोंडवाना देण्याची मागणी नाही. गोंडवाना हे नावच आहे. गोरेवाडा हे नाव आहे. आपल्या विदर्भात गोंडाचं सहाशे वर्ष राज्य झालं. ही गोंडांची राजधानी होती एकेकाळची. गोंड हे इथले मूळचे होते. इंग्रजांच्या पूर्वीपासून गोंडवाना म्हटलं जायचं. याला ऐतिहासिक वारसा आहे. हे नाव बदलून तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव देता. हे बाळासाहेबांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी नाही तर शिवसेनेला स्वत:चा अजेंडा चालवण्यासाठी आहे. त्यांना या भूमीत पाय रोवता येत नाहीत, याची शिवसेनेला पूर्ण कल्पना आहे. मात्र लोकांच्या मनात नावं बदलून परिवर्तन होणार नाही. विदर्भवाद्यांचा आवाज हा दाबण्यात येणार हे नवीन नाही. हे अपेक्षित होतं”, असं श्रीहरी अणे म्हणाले.

विदर्भावाद्यांनी आंदोलनं केली तर विदर्भासाठी आंदोलन केलं असं त्याचं वार्तांकन होत नाही, तर कायदा सुव्यवस्थेसाठी अटक असं केलं जातं. तोडफोड-जाळपोळीच्या नावाखाली अटक केलं जातं. स्थानिक चॅनल्स त्याबाबत माहिती देतात. मात्र त्याचा एक शब्दही पश्चिम महाराष्ट्रातील मीडियात येत नाही, असा आरोपही श्रीहरी अणे यांनी केला.

 “दिल्लीत घडलेल्या हिंसक घटनेचं कुणीही समर्थन करु शकत नाही, पण यामुळे मूळ प्रश्न बाजूला राहतो. आता सर्व बाजूला ठेऊन शेतकरी आंदोलनामुळे मागण्यांवर फोकस करणं गरजेचं आहे” असंही श्रीहरी अणे म्हणाले. कोणी केलं, का केलं याच्यात जाण्यापेक्षा आंदोलनातील मुद्द्यांवर लक्ष द्यायला हवं. कुणालाही कायदा हातात घेता येत नाही, किंबहुना तो घेऊ नये. जर तसं झालं असेल तर उचित कारवाई पोलिसांनी करावी, असं श्रीहरी अणे म्हणाले.