उच्चशिक्षित मुलीने मुंडन करून केले पित्याचे अंत्यसंस्कार

January 28,2021

वाशीम : २८ जानेवारी - हिंदू संस्कृतीमध्ये स्मशानभूमीत महिलांना प्रवेश तसा अशुभ मानला जातो. आजही काही समाजामध्ये या रूढी परंपरा अबाधितपणे सुरु आहे. मात्र वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे पित्याच्या मृत्यूनंतर उच्च शिक्षित मुलीने आपल्या पित्याला मुंडन करुन अग्नी दिल्याची घटना घडली आहे.

वाशीमच्या मंगरुळपीर येथील किलोसींग ऊर्फ गजेंद्रसिह ठाकुर हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल नागपूर येथे हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. 26 जानेवारी रोजी त्यांचा रस्ता अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मूळ गावी मंगरुळपीर येथे त्यांचे अंत्यसंस्कार होणार होते. मात्र किलोसिंग यांना दोन मुली असल्याने चितेला अग्नी कोण देणार असा प्रश्न समजातील नागरिकांना पडला. मात्र किलोसिंग यांची मोठी मुलगी नेहा जी डॉक्टर आहे त्यांनी चितेला अग्नी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मुंडन ही केले.

ठाकूर यांच्या परिवारात दोन मुली असून मुलींना उच्च शिक्षण दिले आहे. मुलगा आणि मुलीमध्ये भेद न ठेवता त्यांच्यावर त्याप्रमाणे संस्कार केले आहे. पित्याच्या चितेला मुलानेचं अग्नी देण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणेचं मुलीने अग्नी दिला. नेहाच्या आईला या गोष्टीचा गर्व आहे. तर समाजाने घातलेल्या रूढी परंपरा तोडून हा अंत्यसंस्कार पार पाडला. शिक्षणाचा आणि संस्कारचा खरा उपयोग झाल्याचं नेहा सांगतात. हा प्रसंग पाहून अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या उपस्थितांचे मन हेलावले.

आज प्रतेक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असला तरी जुन्या रुढी परंपरा समाजात आज ही तशाच टिकून असल्याचे चित्र दिसते. मात्र त्या परंपरा झुगारून डॉ. नेहा आणि ठाकूर कुटुंबाने उचलले पाऊल समाजाला एक वेगळा संदेश देणारे आहे.