लाल किल्ल्यावर झेंडा फडकाविणाऱ्याला पोलिसांनी रोखले का नाही - राकेश टिकैत यांचा सवाल

January 28,2021

नवी दिल्ली : २८ जानेवारी - प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारादरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्याऱ्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी का रोखलं नाही? असा सवाल भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी उपस्थित केला आहे. पंजाबी अभिनेता दीप सिंधू या प्रकरणात सामिल होता, यावर बोलताना टिकैत यांनी हे भाष्य केलं.

टिकैत म्हणाले, कोणीतरी लाल किल्ल्याच्या एका डोमवर चढला आणि त्या ठिकाणी झेंडा फडकवला. यावेळी पोलिसांनी गोळीबार का केला नाही? यावेळी पोलीस कुठे होते? ही व्यक्ती त्या ठिकाणी कशी पोहोचली? पोलिसांनी त्याला जाऊ दिले अटकही केली नाही. अद्यापही त्याला अटक झालेली नाही. ती कोण व्यक्ती आहे जी संपूर्ण शेतकरी वर्गाला आणि त्यांच्या संघटनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे? असे काही प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

“हिंसाचाराद्वारे शेतकरी आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न करणारे लोक कोण आहेत? त्यांना आम्ही ओळखतो, त्यांची ओळख पटलेली आहे. हे सर्वजण राजकीय पक्षाचे लोक असून आंदोलनाला बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे,” असं राकेश टिकैत या अगोदर म्हणाले होते.

दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला आहे. तर, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील दीप सिद्धू हा भाजपा कार्यकर्ता असून, त्याचे पंतप्रधानांबरोबर फोटो असल्याचेही म्हटले आहे.

“दीप सिद्धू हा शीख नसून तो भाजपाचा कार्यकर्ता आहे. पंतप्रधानांसोबत त्याचा फोटो देखील आहे. ही शेतकर्यांची चळवळ आहे आणि तशीच राहील. काही लोकांनी त्वरित हे ठिकाण सोडले पाहिजे. ज्यांनी बॅरिकेट्स तोडली ते कधीच आंदोलनाचा भाग होणार नाहीत” असंही राकेश टिकैत काल म्हणाले होते.