आता सिंधू बॉर्डरवर आणखी एक आंदोलन सुरु

January 28,2021

नवी दिल्ली : २८ जानेवारी - कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असलेल्या सिंघू बॉर्डरवर आणखी एक आंदोलन सुरू झालं आहे. सिंघू बॉर्डर परिसरातील रहिवासी असल्याचा दावा करत काही नागरिकांच्या गटानं शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी मोर्चा काढला. दिल्ली महामार्ग मोकळा करण्याची मागणी करत स्थानिकांनी निदर्शनं केली.

दिल्लीच्या सीमेवरील सिंघू बॉर्डरवर सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यास रोखल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी सिंघू बॉर्डरवर मुक्काम ठोकत आंदोलन सुरू केलं. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनाला हिंसेचं गालबोट लागलं. त्यावरून वादंग निर्माण झालेलं असताना अचानक सिंघू बॉर्डर आणखी एक आंदोलन सुरू झालं.

बुधवारी दुपारी अचानक सिंघू बॉर्डर परिसरातील रहिवाशी असल्याचा दावा करत नागरिक व युवक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी जमा झाले. त्यानंतर घोषणाबाजी करत स्थानिक आंदोलकांनी दिल्ली महामार्ग रिकामा करण्याची मागणी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे केली. शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे आपल्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टर रॅलीदरम्यान भारतीय ध्वजाचा अवमान करण्यात आला, असं आंदोलन करणाऱ्या स्थानिकांनी म्हटलं आहे.