इंद्रावती व गोदावरीचे पाणी अडचण सिंचन प्रकल्प उभारल्यास गडचिरोलीला फायदा - जयंत पाटील

January 28,2021

गडचिरोली : २८ जानेवारी - गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा, प्राणहिता, इंद्रवती व गोदावारी या नदीतून मुबलक प्रमाणात पाणी वाहत जाते. या भागात पाणी अडवून किंवा उपसा करुन सिंचन प्रकल्प उभारल्यास मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ करता येईल असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अहेरी येथे केले. 

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाबाबत माहिती जाणुन घेतली. यावेळी त्यांनी रेगुंठा सह इतर उपसासिंचन येत्या दोन वर्षात गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यासाठी आवश्यक निधीची तरतूद बजेटमध्ये केली जाईल असे ते यावेळी म्हणाले. या बैठकीला अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता, कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर आर.डी. मोहिते, अधीक्षक अभियंता चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ पद्माकर पाटील, कार्यकारी अभियंता गडचिरोली पाटबंधारे अविनाश मेश्राम, तहसीलदार ओंकार ओतारी व पाटबंधारे विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री यांनी यावेळी जिल्ह्यातील पूर्ण व चालू स्थितीतील 61 सिंचन प्रकल्पांचा आढावा घेतला. जिल्ह्यात पूर्ण झालेले प्रकल्प एकूण 30 आहेत. यातून आता 34 हजार 319 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. यात 2 मोठे सिंचन प्रकल्प, 1 बॅरेज, 7 लघु, 15 मामा तलाव व 5 उपसा सिंचन प्रकल्प आहेत. तसेच सध्या 8 प्रकल्प बांधकामाधीन आहेत, येत्या दोन वर्षात ते पूर्ण झाल्यास 25 हजार 757 हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ होईल. यामध्ये 5 उपसा सिंचन योजना, 1 बॅरेज व 2 लघु प्रकल्प आहेत. अशाप्रकारे पूर्ण झालेले व चालू तसेच अन्वेषणाधीन प्रकल्प मिळून 61 सिंचन प्रकल्पातून जिल्ह्यातील 1 लाख 83 हजार 12 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. याबाबत आज बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेतला.