‘नशामुक्ती’ राबविण्यासाठी स्वयंसेवकांनी जोमाने प्रयत्न करावेत - रवींद्र ठाकरे

January 28,2021

नागपूर : २८ जानेवारी - नशामुक्त भारत अभियान केंद्र शासनानी जोरकसपणे राबवावयाचे ठरविले आहे. यासाठी 272 जिल्हे देशातून निवडण्यात आले आहे. यामध्ये नागपूरसह मुंबई, पूणे, नाशिक यांचा समावेश आहे. जिल्हयात शहरासह, तालुके तसेच ग्रामीण भागात व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नशामुक्त भारत अभियानात प्रशिक्षीत स्वयंसेवकाची भूमिका फार महत्वाची आहे. कुठलीही गोष्ट समाज         सहसा स्विकारत नाही तोपर्यंत ती साध्य होत नाही, त्यासाठी जोमाने काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी उदघाटनीय कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करतांना केले.

केंद्र शासनाच्या समाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने नशामुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आयोजित कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, बार्टीचे संचालक दिवाकर गमे, एनआयएसडीच्या  राज्य समन्वयक प्रज्ञा खोब्रागडे, सहाय्यक आयुक्त सामाज कल्याण बाबासाहेब देशमुख व मधूर एकात्मिक व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. विनोद गजघाटे  यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

व्यसनांध व्यक्तीच्या मेंदुवर नशा लवकरच ताबा घेते, त्यामुळे त्याला जीवास मुकण्यासही कमीपणा वाटत नाही. जीवनात अडचणी येतात, त्यावर मात करता आले पाहिजे. असे न केल्यास स्वत:ची व पर्यायाने कुटूंबाची वाताहत होण्यास कारणीभूत ठरते. आव्हानांना समर्थपणे तोंड देण्याऐवजी नशेच्या आहारी जाणे योग्य नाही. आज विडस् सारखे नशेचे प्रमाण भारतात वाढत आहे. तसेच नागपूर घशाच्या कँसरचे कॅपिटल झाले आहे,  या बाबींचा विचार करता जोमाने नशामुक्त अभियान राबविणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. नशा शरिर खोकले करते, सामाजिक आयुष्य नष्ट होते.  त्यासाठी कार्यशाळेत  उपस्थित स्वयंसेवकांनी डॉक्टरांचे काम करावे. समाजातील व्यसनाला आहारी गेलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम करावे. त्यांचे समुपदेशन करा. स्वत: समर्थ बना व दुसऱ्यांना समर्थ करा, असे ते म्हणाले.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात  जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक भोनेश्वर शिवनकर यांनी उद्योजकता विकास व व्यवसाय प्रशिक्षण याविषयावर बोलतांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती व पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनांची माहिती दिली. रोजगाराअभावी तरुण व्यक्ती नशेच्या आहारी जातो. म्हणून नोकरीच्या मागे न लागता उद्योग व व्यवसायाकडे वळा असे त्यांनी सांगितले.

दुसऱ्या सत्रात एनआयएसडीच्या  राज्य समन्वयक प्रज्ञा खोब्रागडे यांनी नशामुक्त भारत अभियानाचे प्रस्तावना विषद केली. पुरवठा-मागणी-तपासणी  यात्रीसूत्रीला खंडीत केल्याशिवाय नशामुक्ती होणार नाही. पर्यायाने त्यात घट कशी येईल याकडे स्वयंसेवकाने लक्ष देणे गरजेचे आहे.  नशामुक्तीसाठी ध्यान करणे अतीआवश्यक आहे. तसेच व्यसनाधीन व्यक्तीचे समुपदेशन करणे गरजे आहे, असे त्या म्हणाल्या. समुपदेशन, प्रतिकारशक्तीत वाढ, मित्र परिवाराचे सहकार्य तसेच तपासणी याबाबी करणे आवश्यक आहे. अतीव्यासनाधीन व्यकती असल्यास त्याला व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्रात दाखल करावे, असे त्यांनी सांगितले.नशामुक्तीसाठी शाळा, कॉलेज, पालक व समाजात समुपदेशन करुन जागृती करा. यासाठी आशावर्कर अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यत्यांची घ्या, असे त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.           या कार्यशाळेला 80 स्वयंसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.