घ्या समजून राजे हो.....नाना तुम्ही आक्रमक जरुर व्हा पण समंजसपणा विसरु नका...

February 19,2021

अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार या अभिनेत्यांनी ज्यावेळी मनमोहनसिंग पंतप्रधान होते त्यावेळी पेट्रोलचे भाव वाढले असताना ट्विटवर वरुन सरकारविरोधात प्रतिक्रिया नोंदविली होती. आता मोदी सरकारात दररोज भाव वाढत असतानाही या दोघांनीही मौन का बाळगले आहे? त्यांनी निषेधाची प्रतिक्रिया दिली नाही तर या दोघांचेही चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही आणि त्यांच्या चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी काल भंडार्‍यात दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी कांँग्रेसही मैदानात उतरली आहे. सहाजिकच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने नाना पटोलेंवर जोरदार हल्लाही चढवला आहे.

सर्वसाधारणपणे असे चित्रपट प्रदर्शिन न होऊ देणे, कार्यक्रम रोखून धरणे, शूटिंग बंद पाडणे अशा धमक्या देऊन त्या प्रत्यक्षात आणण्याचे काम करण्याचा कॉपीराईट आतापर्यंत महाराष्ट्रात शिवसेना आणि महाराट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांकडेच होता. त्यामुळे काँग्रेसची ही आक्रमकता बघून जनसामान्यांना हा महाआघाडीतील संगतीचा तर परिणाम नाही ना असा प्रश्‍न पडलेला दिसतो आहे. नाना पटोले हे एक आक्रमक म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे नानांनी आपल्या स्वभावानुसार आता शिवसेना स्टाईलने काँग्रेसमध्ये नवनचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न तर केला नाही ना अशीही शंका घेतली जाते आहे.

मुळात अशा प्रकारे नानांनी धमकी देणे योग्य होते काय या विषयावरही समाज माध्यमांवर चर्चा सुरु झालेली दिसते आहे. पेट्रोल-डिझेल आणि कुुकींग गॅस यांचे भाव वाढण्याची आजची काही पहिलीच वेळ नाही. 50 वर्ष मागे गेल्यास 1970 साली भारतात 41 नवे पैसे प्रति लीटर या दराने पेट्रोल विकत मिळत होते. तेव्हापासून वाढत वाढत ज्यावेळी मनमोहनसिंगांनी सत्ता सूत्रे खाली ठेवली त्यावेळी पेट्रोल 80 रु.लीटरच्या आसपास पोहोचले होते. ही बाब लक्षात घेता 1970 पासून 2014 पर्यंत  पेट्रोलचे भाव 200 पटीने वाढले.या काळात दीर्घकाळ कांँग्रेसचेच राज्य देशभरात होते. म्हणजे पेट्रोलच्या भावाची भरमसाठ वाढ करण्याची मुहूर्तमेढ काँग्रेसनेच रोवली असे म्हणावे लागते.अशा वेळी 6 वर्षात 18 ते 20 रुपयांनी पेट्रोलचे भाव वाढवणार्‍या भाजपला धारेवर धरताना आधी कांग्रेसच्या प्रदीर्घ राजवटीत पेट्रोलचे भाव 200 पटींनी का वाढले याचेही उत्तर शोधायला हवे आणि एक अभ्यासू राजकारणी या नात्याने जनसामान्यांसमोर हे उत्तर ठेवायलाही हवे.

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढण्यासाठी जी प्रमुख कारणे आहेत त्यातील एक कारण हे केेंद्र सरकारचे धोरण मानता येईल. आपल्याला जे पेट्रोल मिळते त्यावर केंद्राचे जसे कर लागतात तसेच राज्यसरकारचेही कर लागतात. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार पेट्रोलवर जे काही कर घेते त्याच्या दुप्पटीने राज्यसरकार कर लावत असते. इथे राज्य सरकारने ठरवले तर ते काही प्रमाणात कर भार कमी करून आपल्या नागरिकांना दिलासा देऊ शकते. सध्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात असे भाव वाढले तेव्हा राज्याचे कर कमी करून जनतेला दिलासा दिला असल्याचा दावा केला आहे.  हा दावा जर खरा असेल तर आजच्या सरकारनेही तसे प्रयत्न का केले नाही असा प्रश्‍नही जनसामान्यांच्या मनात येतो. याचे उत्तरही नानांनी शोधायला हवे आणि असे शक्य असेल तर राज्य सरकारला तसे त्यांनी सूचवायला हवे. काँग्रेस पक्ष आज महाराष्ट्रात सत्ताधारी असलेल्या महा आघाडीचा घटक पक्ष आहे. या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना जनतेला दिलासा देण्यासाठी असा आग्रह निश्‍चितच धरू शकतात. गेल्या आठवड्यात नागपुरात आले असताना काँग्रेस पक्ष कायम जनतेसमोर सोबत असेल असे विधान नानांनी पत्रकारांशी बोलताना केले होते. हे विधान लक्षात घेतले तर जनतेसोबत जाण्यासाठी नानांनी आपल्या पक्षाच्या मंत्रिमंडळात असलेल्या सहाकर्‍यांना तसा आग्रह धरण्याची सूचना का देऊ नये? मात्र असे न करता नाना फक्त सेलिब्रिटिंनाच दमदाटी करताहेत  ही बाब पचायला जरा जड जाणारी आहे.

आता देशातील कोणत्याही व्यक्तीने कोणावर टिका करावी आणि कोणाला डोक्यावर घेऊन नाचावे याचे त्याला स्वातंत्र्य निश्‍चित आहे. समजा सरकारच्या विरोधात कोणी काही बोलले आणि त्या व्यक्तीवर कोणत्याही पद्धतीने कारवाई होतांना दिसली. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होतो म्हणून नानांचा पक्षच सध्या ओरड करतो आहे. अशावेळी आणिबाणीच्या काळात याच पक्षाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच तर राहू द्या पण चक्क गळा घोटला होता ही बाब ही मंडळी विसरून जातात. इथेही पुन्हा ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करण्यासाठी सज्ज झालेले दिसत आहेत. अक्षयकुमार आणि अमिताभ बच्चन यांनी मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांच्यावर केलेली टीका त्याचवेळी काँग्रेसजनांना झोंबली असावी. मात्र आज काही वर्ष लोटल्यावर त्याचा असा बदला घेण्यासाठी आम्हाा ते तुम्ही बोला नाहीतर महाराष्ट्रात तुमच्यावर बहिष्कार घालू असा इशारा काँग्रेस पक्षात असलेल्या नानांनी द्यावा हे काहीसे न पटण्याजोगे आहे.

अक्षयकुमार आणि अमिताभ बच्चन यांनी कोणत्यावेळी कोणावर टीका करावी हा पूर्णतः त्यांचा व्यक्तिगत प्रश्‍न आहे. अशा वेळी कोणताही पक्ष किंवा व्यक्ती त्यांचेवर जबरदस्ती करू शकत नाही. मात्र ही मर्यादा ओलांडत नानांनी आम्ही त्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. आणि शूटिंग बंद पाडू अशी धमकी दिली आहे.

हे दोन अभिनेते जनतेच्या मुद्यांवर जनतेला साथ देत नाही म्हणून त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला अशी विनंती नाना आणि त्यांचा पक्ष निश्‍चित करू शकतो.   त्यांचे मुद्दा या राज्यातील जनतेला पटले तर जनता त्यांना साथ देईलही मात्र चित्रपटांचे प्रदर्शन रोखणे किंवा शूटिंग बंद पाडणे हा कायदा हातातच घेण्याचा प्रकार आहे. असा प्रकार कांँग्रेस संस्कृतीला शोभणारा आहे काय  याचा विचारही नानांनी करायला हवा.

काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशात सुसज्ज अशी नवी फिल्मसिटी उभारण्याची घोषणा केली होती. त्यावेळी महाआघाडी सरकारच्या सर्व घटक पक्षांनी हा महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीचा व्यवसाय उत्तरप्रदेशात पळवून नेण्याचा भाजपचा कट आहे अशी ओरड केली होती. त्यात नानांच्या पक्षाचे सचिन सावंत, राजू वाघमारे, भाई जगताप असे सर्वच दिग्गज कंठशोष करीत सहभागी झाले होते. आता या दोन प्रमुख अभिनेत्यांची भूमिका असणार्‍या चित्रपटांची निर्मिती तुम्ही अशा पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न करत असाल तर आपसुकच चित्रपट निर्माते पुढली निर्मिती उत्तरप्रदेशच्या चित्रनगरीत करण्याचा विचार करू लागतील. आज इथले राजकीय पक्ष अमिताभ आणि अक्षयच्या चित्रपटांना विरोध करताहेत उद्या इतर अभिनेत्यांच्याही बाबतीत असेच मुद्दे उपस्थित करून चित्रीकरण रोखले तर काय करता? त्यापेक्षा इथे चित्रीकरणच नको असा ते विचार करतील. अशा वेळी या व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेकडोंचा रोजगार मारला जाईल हे नाना पटोले आणि त्यांच्या पक्षाला चालणार आहे काय याचाही विचार करायला हवा.

हे सर्व मुद्दे लक्षात घेता नाना पटोलेंनी पक्ष विस्तारासाठी आक्रमक जरुर व्हावे पण त्याचवेळी जनसामान्यांचा विचार करून थोडा समजंसपणाही दाखवला हवा इतकेच त्यांना सूचवावेसे वाटते. बाकी नाना सुज्ञ आहेतच. ते योग्य तो विचार करतील अशी अपेक्षा करायला आजतरी हरकत नसावी.

 

  तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....

ता.क.ः घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या ुुु.षरलशलेेज्ञ.लेा/इश्रेससशीर्ईंळपरीहझरींहरज्ञ या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

 

                             -अविनाश पाठक