माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात हजारोंची गर्दी

February 22,2021

मुंबई : २२ फेब्रुवारी - राज्यात एकीकडे पुन्हा एकदा करोना संकट डोकं वर काढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसाठी पुढील आठ दिवसांचा अल्टीमेटम दिली आहे. 

रुग्णसंख्या नियंत्रणात राहावी यासाठी राज्य सरकार अनेक कठोर पावलं उचलताना दिसत आहे. 

दुसरीकडे पुण्यात कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. 

या सोहळ्यात हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले आणि नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करण्यात आलं. 

विशेष म्हणजे या लग्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. 

राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. 

त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत येत्या आठ ते दहा दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं. 

त्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. 

त्यामध्ये सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी आणि २८ तारखेपर्यंत शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 तर लग्नसोहळा २०० लोकांमध्ये आणि सर्व नियम पाळून करण्याचे आवाहन केलं होतं. 

मात्र त्याच दरम्यान कोल्हापूर येथील माजी खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव पृथ्वीराज आणि वैष्णवी यांचा विवाहसोहळा हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. 

या सोहळ्यास शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित होते.