अँटीजेन टेस्ट घेण्याचे अधिकार नसतानाही टेस्ट करून तोंडी रिपोर्ट दिल्याबद्दल पॅथॉलॉजी लॅबला ठोठावला दंड

February 23,2021

अमरावती : २३ फेब्रुवारी - खासगी लॅबकडून होणारी अँटीजेन  टेस्टची प्रक्रिया यापूर्वीच रद्द केली आहे. मात्र, रुग्णाच्या घरी जाऊन अँटीजेन  टेस्ट करून त्यांना पॉझिटिव्ह असल्याबाबत लेखी रिपोर्ट न देता तोंडी माहिती देऊन रुग्णालयात पाठविणा-या येथील डॉ. उल्हास संगई यांच्या संगई पॅथॉलॉजी लॅबला पन्नास हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या अहवालावरून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ही कारवाई केली. याबाबत माहिती अशी की, येथील एका कुटुंबाने कोरोना चाचणी करण्याबाबत संगई पॅथॉलाजी लॅबला दूरध्वनीद्वारे विनंती केली. त्यानुसार लॅबच्या प्रतिनिधीने त्यांच्या घरी येऊन रॅपिड अँटीजेन  टेस्ट केली. त्यानंतर लॅबच्या प्रतिनिधीकडून दोन व्यक्ती कोरोना संक्रमित (पॉझिटिव्ह) असल्याचे व सुपर स्पेशालिटी रूग्णालय येथे दाखल होण्याबाबत तोंडी सांगण्यात आले. 

संगई लॅबतर्फे या कुटुंबाला कुठलाही लेखी रिपोर्ट देण्यात आला नाही. त्यानंतर हे कुटुंबीय सुपर स्पेशालिटी रुग्णालय भरती होण्यासाठी गेले असता हॉस्पिटलने रिपोर्टची मागणी केली. तथापि, तसा रिपोर्ट लॅबने दिला नसल्याचे त्या कुटुंबीयांनी सांगितले. लॅबला रॅपिड अँटीजेन  टेस्ट थांबविण्याबाबत व अशी चाचणी करण्याची लॅबची मान्यता रद्द करत असल्याबाबत आरोग्य प्रशासनाने यापूर्वीच पत्र दिले होते. त्यानंतरही लॅबकडून अँटीजेन  टेस्ट केली जात असून, केवळ तोंडी माहिती देऊन रुग्णाची बोळवण केली जात असल्याचे विभागीय संदर्भ रुग्णालयाला आढळून आले. 

त्यावरून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश खडसे व डॉ. सोपान भोंगाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या प्राप्त अहवालावरून अमरावती येथील डॉ. उल्हास संगई यांच्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये विनापरवानगी अँटीजेन  टेस्ट केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाला आढळून आले. त्यावरून जिल्हा दंडाधिकारी नवाल यांनी डॉ. संगई यांना 50 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. या रकमेचा भरणा सात दिवसांच्या आत महापालिकेकडे करावा आणि येथून पुढे कोणत्याही प्रकारचे विधीग्राह्य नसलेले कृत्य केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, तसेच लॅबोरेटरी बंद करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशान्वये देण्यात आला आहे.