तलाव संवर्धनाच्या मागणीसाठी तलावाच्या अन्नत्याग आंदोलन सुरु

February 23,2021

चंद्रपूर : २३ फेब्रुवारी - ऐतिहासिक, गोंडकालीन रामाळा तलाव संवर्धनाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी सोमवारी तलावाच्या काठावरच अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला सुरूवात केली आहे. या आंदोलनाला महानगरातील विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. 

रामाळा तलाव संवर्धनाच्या विविध विभागाकडे असलेल्या अन्य मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांचे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, संस्कृती मंत्री प्रल्हाद पटेल तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगर विकास मंत्री तथा संपर्क मंत्री एकनाथ शिंदें यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देणार्या शिष्टमंडळात इको-प्रोचे नितीन बुरडकर, नितीन रामटेके, अब्दूल जावेद, धर्मेंद्र लुनावत यांचा समावेश होता. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांना दिले. 

उपोषणाच्या पहिल्या दिवशी अनेक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देत समर्थन व पाठींबा दिला. यात सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी अभय बडकेलवार, पर्यावरणवादी योगेश दुधपचारे, चंद्रपूर व्यापारी मंडळचे अध्यक्ष रामजीवनसिह परमार, सचिव प्रभाकर मंत्री, किशोर जामदार, पाच देउळ सचिव मुरलीधर झोडे, जंगल जरनी ग्रुपच्या चित्रा इंगोले, ऋतुजा मुन, नेत्रकमल संस्थेच्या नेत्रा इंगुलवर, प्रगती पडगेलवार, भद्रावती इको-प्रोचे किशोर खंडाळकर, अमोल दौलतकर यांनी भेट दिली. 

सोमवारी सकाळी 10 वाजता रामाळा तलाव काठावर उपोषण मंडप उभारण्यात आले. तलाव परिसरात इको-प्रो सदस्याकडून जनजागृतीसुद्धा करण्यात येत आहे. मागण्यांबाबत ‘गूगल अर्थ इमेज’च्या सहाय्याने समस्या आणि उपाय याबाबत सांगण्यात येत आहे. उपोषणाच्या पूर्व संध्येला इको-प्रोची मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी पत्रके वाटप करण्यात आले.