भरधाव ट्रकच्या धडकेत दोन मित्रांचा जागीच मृत्यू

February 23,2021

यवतमाळ : २३ फेब्रुवारी - भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दोन मित्रांचा गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना यवतमाळ-घाटंजी मार्गावर असलेल्या एका महाविद्यालयाजवळ काल रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास घडली. शेख जाहीद शेख जाकीर वय २१ वर्ष आणि केतन पुंडलीक राठोड वय २४ वर्ष दोघेही रा. यवतमाळ अशी मृतकांची नावे आहे. या दोघाच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या अमीर लॉनमध्ये  शेख यांच्या नातेवाईकांकडे लग्न समारंभ होता. लग्न आटोपल्यानंतर नवरी मुलीकडे यवतमाळ-घाटंजी मार्गावरील सावरगड येथे कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी शेख जाहीद याला बोलावण्यात आले होते. त्यामूळे शेख जाहीद हा मित्र केतन राठोड याच्या दुचाकी क्रमांक एमएच-२९-बीजी-३९४८ ने सावरगडकडे निघाला होता. अश्यात रात्रीच्या सुमारास भरधाव ट्रक क्रमांक एमएच-२९-टी-१६८0 ने शेख जाहीद याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले होते. ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात येता त्याने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती शेख कुटूंबीयांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून दोघांनाही जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषीत केले. या प्रकरणी यवतमाळ ग्रामिण पोलिस ठाण्यात त्या ट्रक चालकाविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामिण पोलिस करीत आहे.