गोंदियात पोलीस आणि नक्षलवाद्यात झाली चकमक

February 23,2021

गोंदिया : २३ फेब्रुवारी - नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सालेकसा तालुक्यातील आंबाटोला परिसरात गोंदिया पोलिस सर्च ऑपरेशनवर असताना पोलिस व नक्षल्यात चकमक झाली. ही घटना आज सकाळी ८ वाजता दरम्यान आहे. पोलिसांचा जोरदार प्रतिकार पाहता नक्षल्यांची जंगलाच्या दिशेने पळ काढला. घटनास्थळी सर्च ऑपरेशन सुरू असून दर्रेकसा   दलम तसेच प्लाटून ५५ दलमच्या १८ ते २0 नक्षल्यांविरूध्द सालेकसा पोलिस ठाण्यात विविध कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सालेकसा तालुक्यातील हाजराफाल, कोपालगड, मरामजोब, महामाया पहाडी टॉवर लाईन भागात नक्षलवादी मोठा घातपात करण्याचे उद्देशाने फिरत असल्याची गुप्त माहिती सालेकसाचे ठाणेदार प्रमोद बघेले यांना मिळाली. दरम्यान जिल्हा पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सालेकसा येथील तुरकर पथक, नवेगावबांध येथील कांटगे पथ, बीडीडीएस पथक यांनी संयुक्तरित्या जंगल परिसरात सर्च अभियान राबविले. आंबाटोला जंगल परिसरात १८ ते २0 शस्त्रधारी नक्षलवादी त्यांना दिसले. दरम्यान पोलिसांकडून त्यांना आत्मसर्मपण करण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु, सशस्त्र नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर अंधाधुद गोळीबार केला. पोलिसांनी नक्षल्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत घातपाताचा डाव हाणून पाडला. पोलिसांचा जोरदार प्रतिकार पाहता १८ ते २0 नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. या प्रकरणी र्देकसा दलम तसेच प्लाटून ५५ दलमच्या १८ ते २0 नक्षल्यांविरूध्द सालेकसा पोलिस ठाण्यात विविध कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नक्षलविरोधी अभियानाव्दारे शोध अभियान सुरू असून तपास पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी जगदिश पांडे करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी जगदिश पांडे, सालेकसाचे सपोनि प्रमोदकुमार बघेले, तुरकर पथक विशेष अभियान पथक सालेकसा, कांटगे पथक नवेगावबांध व बीडीडीएस पथक गोंदिया यांनी केली.