कुख्यात गुन्हेगाराची चार आरोपींनी केली हत्या

February 23,2021

नागपूर : २३ फेब्रुवारी - सोनेगाव हद्दीत एक कुख्यात गुन्हेगाराची चार आरोपींनी चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना २२ फेब्रुवारीला सायंकाळी ६ ते ६.३0 वाजताच्या दरम्यान खामला ते जयताळा जुना आऊटर रिंग रोड शिवारात घडली. नीलेश राजेश नायडू ( ३५) रा. गोपालनगर असे मृताचे नाव आहे. मृत स्वत: कुख्यात आरोपी होता. त्याच्यावर खून, घरफोडी, चोरी यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. शुक्रवारीच तो मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडला होता.

प्राप्त माहितीनुसार, नीलेश हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. खून, मारमारी, चोरी, धमकाविणे, घरफोडी अशा गुन्हय़ात तो शिक्षा भोगत होता. 

शुक्रवारी (ता. १९) मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता. सोमवारी तो त्याचा मित्र प्रतीक सहारे याच्यासोबत जयताळा रोडवर रेल्वे शिवारात पायोनिअर बिल्डिंगजवळ बसला होता. दरम्यान, तेथे चार आरोपी आले. त्यांनी येताच नीलेशवर चाकूने सपासप वार करणे सुरू केले. त्याचा मित्र प्रतीक त्याला वाचवायला आडवा आला. पण, आरोपींनी त्यालाही मारण्याच प्रयत्न केला. त्यामुळे कसाबसा तो त्यांच्या तावडीतून पळून गेला. 

आरोपींनी नीलेशवर चाकूने घातक वार करून त्याचा तेथेच मुडदा पाडला आणि पसार झाले. याबाबत सोनेगाव पोलिसांना माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. याप्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी फरार आहेत. सोनेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांच्याशी याप्रकरणी संवाद साधला असता तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.