नागपुरातील कस्तुरचंद पार्क आणि झिरो माईलच्या विकासकामांचा कालबद्ध कार्यक्रम द्या - उच्च न्यायालय

February 23,2021

नागपूर : २३ फेब्रुवारी - शहरातील कस्तुरचंद पार्क आणि झिरो माईलच्या विकासासंदर्भातील कामे कधी पूर्ण करणार, याचा कालबद्ध कार्यक्रम गुरुवारपर्यंत सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला दिले.

कस्तुरचंद पार्कची विविध कार्यक्रमांच्या आयोजनामुळे दुरवस्था झाली आहे. येथील ऐतिहासिक वास्तूचेही नुकसान होत आहे. सीताबर्डी परिसरातील झिरो माईलचीदेखील अशीच स्थिती आहे. याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून दोन जनहित याचिका दाखल करून घेतल्या आहेत. सोमवारी या दोन्ही याचिकांवर संयुक्तरित्या सुनावणी झाली. यावेळी मनपाच्या ऐतिहासिक वारसा सवंर्धन समितीने झिरो माईलसंदर्भात शपथपत्र दाखल केले. मात्र, त्यात विकासाकार्यासंदर्भात कोणत्या विभागाकडे कोणत्या कामाची जबाबदारी देण्यात आली व ती कामे कधी पूर्ण होणार याचा निश्चित असा उल्लेख नव्हता. त्यामुळे न्यायालयाने विकासाचा कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झिरो माईल आणि केपीच्या विकासकामांवर देखरेख ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याचे शपथपत्र ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीने दाखल केले. दोनही स्थळांचे विकासकामे, सौंदर्यीकरण, देखभाल व दुरुस्ती, साफ-सफाई, अतिक्रमण आदी बाबींवर टास्क फोर्स लक्ष ठेवणार आहे.