महिला तहसीलदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ट्रक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 23,2021

नागपूर : २३ फेब्रुवारी - परवाना नसताना वाहनातून गिट्टीची वाहतूक करणार्या ट्रक मालकाला जाब विचारला म्हणून त्याने हिंगण्याच्या महिला तहसीलदारांसोबत अरेरावी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ट्रक मालकाने महिला तहसीलदाराला ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी ट्रक मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ज्योती विक्रम भोसले (३३) रा. हिंगणा टाऊन, धनगरपुरा या हिंगण्याच्या तहसीलदार आहेत. २१ फेब्रवारीला दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्या वानाडोंगरी पथकामार्फत हिंगणा तालुक्यातील गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक करणार्या वाहनाची तपासणी करीत होत्या. दरम्यान, एमआयडीसी हद्दीतील हिंगणा नागपूर रोडवरील पायोनियर वुडस सोसायटीजवळ त्या एमएच ३१/डीएस ६0३७ क्रमांकाच्या ट्रकची तपासणी करीत होत्या. त्यांनी आरोपी मालक र्शावण मनोहर गोसावी ( ४४) रा. वॉर्ड क्र.१, बौद्ध विहारामागे इसासनी आणि चालकाच्या वाहनाचे इनव्हाइस नंबर महामिनिंग अँपवर तपासले असता वाहतूक परवान्याची मुदत संपलेली आढळली. तसेच दगडी गिट्टी वाहतुकीचा परवाना नसताना वाहनामध्ये तीन ब्रास दगडी गिट्टीची वाहतूक करताना दिसून आले. त्यांनी ट्रकमालक आणि चालकाला दगडी गिट्टीच्या अवैध वाहतुकीसंदर्भात विचारणा केली असता त्याने ज्योती यांच्याशी वाद करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.