सर्व नियमांसह विवाह सोहळ्यांना मुभा द्या - भाजप आमदारांची मागणी

February 23,2021

नागपूर : २३ फेब्रुवारी - 'विधिमंडळाचे अधिवेशन असले की राज्यकर्त्यांना करोना आठवतो आणि अधिवेशन झाले की विसर पडतो', अशी तोफ भाजपचे आमदार कृष्णा खोपडे व विकास कुंभारे यांनी डागली. करोनाच्या सर्व नियमांसह विवाह सोहळ्यांना मुभा द्यावी, या मागणीसाठी उभय आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

करोनाच्या विळख्यात राज्य पहिल्या क्रमांकावर होते. नियम व सूचनांच्या अंमलबजावणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने परत संकट ओढवले. लॉकडाउनच्या उंबरठ्यावर राज्य आले आहे. अधिवेशनाच्या तोंडावर राज्यकर्त्यांना करोना आठवतो आणि अधिवेशन झाले की विसर पडतो. येत्या १ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून करोनाकडे जनतेचे लक्ष वळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हा संपूर्ण प्रकार म्हणजे अधिवेशन गुंडाळण्यासाठी सरकारचा डाव असल्याची शंकाही खोपडे व कुंभारे यांनी व्यक्त केली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक विकास कामे थांबवली. वर्षभराच्या काळात एकही उल्लेखनीय काम सरकारने केले नाही. जगात पहिल्यांदा लस तयार करण्याचे काम केंद्र सरकारने केले. करोनाला रोखण्याचे श्रेय खऱ्या पंतप्रधान व देशातील वैज्ञानिकांना आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राचे अभिनंदन करणारा ठराव येत्या अधिवेशनात मांडावा, असे आवाहनही खोपडे व कुंभारे यांनी केले.

राज्यभरात येत्या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात लग्न सोहळ्यांसाठी तारीख ठरली आहे. त्यासाठी मंगल कार्यालयापासून ते निमंत्रण पत्रिका, भोजन, बँड व इतर कार्यासाठी सर्वसामान्यांनी अग्रीम दिले वा खर्च केले. सरकारने नियमांचे सक्तीने पालन करण्याची सूचना करताच सोहळे रद्द कार्यालयाच्या संचालकांकडून दबाव टाकण्यात येत आहे. तसेच, अग्रीम दिलेले पैसे परत मिळण्याची शाश्वती नाही. मध्यमवर्गीय व सर्वसामान्यांसमोर आलेले संकट लक्षात घेऊन कोव्हिडशी संबंधित सर्व नियम व सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर मुभा द्यावी, अशी मागणी खोपडे व कुंभारे यांनी केली आहे.