दोघांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकास ७ वर्षाचा सश्रम कारावास

February 24,2021

वाशीम : २४ फेब्रुवारी - दारु पिऊन वाहन चालवून उभ्या मोटर सायकलला धडक देवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकास 7 वर्ष सश्रम कारवास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा विद्यमान न्यायालयाने ठोठावली. 

याबाबत सविस्तर असे की, पोहा येथील शिक्षक हरिदास उपाध्ये पोहा रस्त्याने कारंजा कडे मोटार सायकलने जात असतांना त्यांचा मुलगा ऋषिकेशला लघवी लागल्यामुळे त्यांनी त्यांची मोटार सायकल रस्त्याच्या बाजुला उभी केली. त्याचवेळी कारंज कडुन येणारी सेंट्रो कार एमएच 04 एपीपी 7660 चा चालक विनोद साहेबराव कोंबरेकर याने कार दारुच्या नशेत भरधाव वेगाने चालवुन हरिदास यांच्या मोटार सायकलला धडक दिली. त्यांच्या गाडीवर असलेली त्यांची मुलगी रुचा ही जागीच मरण पावली. 

हरिदास हे दवाखान्यात उपचार दरम्यान मरण पावले. हरिदास यांची पत्नी ही सुद्धा गंभीर जखमी झाली होती. सोबत त्यांचा मुलगा ऋषिकेश ही होता आणि तो या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. याप्रकरणी कारचालक विनोद कोंबरेकर याचे विरुद्ध पोलिस स्टेशन कारंजा यांनी गुन्हा दाखल करुन मंगरुळनाथ सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. त्यात सरकार पक्षाचे साक्षीदार ग्राह्य धरुन आरोपी विरुद्ध भादवीचे कलम 304 प्रमाणे गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपीला सत्र न्यायालयात सत्र न्यायाधिश डॉ.आर. आर. तेहरा यांनी आरोपीला 7 वर्षे सश्रम कारावास व 10हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 6 महीने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. पी.एस.ढोबळे यांनी काम पाहीले.