सात हजाराची लाच स्वीकारताना शाखा अभियंत्याला अटक

February 24,2021

बुलढाणा : २४ फेब्रुवारी - सांगवा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या एक फळ येथे हायमास्ट लाईट लावण्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेगाव पंचायत समितीचे शाखा अभियंता पुरूषोत्तम पांडुरंग गायकवाड यांना अटक केली.

या कारवाईमुळे पंचायत समिती स्तरावर एकच खळबळ निर्माण झाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सांगवा येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने सांगवा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीत विकास करणे या योजनेअंतर्गत लाईट लावण्याचे काम सदर व्यक्तीने घेतले होते. सदर काम २0२0 मध्ये पूर्ण झालेले आहे झालेल्या कामाचे बिल १ लाख ४३ हजार रुपये काढण्यासाठी शाखा अभियंता पुरुषोत्तम गायकवाड याने सदर फिर्यादीकडे साडेसात हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर सात हजार रुपये ठरले. 

याबाबत फिर्यादीने बुलढाणा येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक अमरावती परिक्षेत्र विशाल गायकवाड अप्पर पोलिस अधीक्षक अरुण सावंत पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी पोलिस उप अधीक्षक आर. एन. माळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विलास साखरे, रवींद्र दळवी, विजय मेहत्रे, चालक पोलिस शिपाई अर्शद शेख यांनी सापळा रचून आरोपी शाखा अभियंता पुरुषोत्तम गायकवाड यांना सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात केली. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे पंचायत समितीमधील अधिकारी वर्गामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.