मुलीचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी पित्यासह आजोबाला अटक

February 24,2021

नागपूर : २४ फेब्रुवारी - पत्नी सोडून गेल्याने तिच्या विरहात विकृत झालेल्या पित्याने पोटच्या सात वर्षीय मुलीचे अपहरण करीत तिची हत्या केल्याची घटना धवळपेठ शिवारात मंगळवारी (२३ फेब्रुवारी) उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, समाजमन सुन्न झाले आहे. बिजली गजानन काळे, असे सात वर्षीय मृत चिमुकलीचे नाव तर गजानन काळे (२७ वर्षे) रा. धवळपेठ, ता. नागपूर असे आरोपी पित्याचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार, पती आरोपी गजानन हा पत्नी ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे पती-पत्नीत नेहमीच वाद व्हायचा. या वादातून दोन महिन्यांपूर्वी पत्नी ज्योती मुलगी बिजलीला घेऊन माहेरी वडिलांकडे राहायला गेली. आरोपी गजानन हा पत्नी व मुलीला घरी आणण्याकरिता सासुरवाडीला अनेकदा गेला. परंतु, सासरे सूर्यभान काकडे हे मुलीला पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे गजानन पत्नी विरहातच राहायचा. घटनेच्या दिवशी अर्थात २२ फेब्रुवारीला बेला येथील गुरुमाऊली आर्शमात नात्यातील लग्न असल्याने काकडे व काळे परिवार या लग्नात आले. दुपारी दोन वाजता लग्न आटोपल्यानंतर मुलीची आई ज्योती व तिचे नातेवाईक चिमुकली बिजली दिसत नसल्याने तिचा शोध घेत होते. मुलीचे आजोबा मोहन काळे यांनी मुलीला तिचे वडील गजानन हा घेऊन गेल्याचे सांगितले. मात्र, सायंकाळ होऊनही ते विवाहस्थळी न पोहोचल्याने मुलीची आई व नातेवाईकांनी बेला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. बेला पोलिस स्टेशनचे प्रभारी साहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांनी शासकीय वाहन उपलब्धतेअभावी तपासात दिरंगाई केली, असा आरोप आहे. रात्री साडेतीन वाजता धवळपेठ परिसरात ती मृतावस्थेत आढळली. बेला पोलिसांनी मुलीचे वडील आरोपी गजानन काळे व आजोबाविरोधात गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली.

मुलीच्या बेपत्ता व अपहरणाची तक्रार बेला पोलिस स्टेशनला सायंकाळी सहा वाजता करूनही बेला पोलिसांनी तपासात दिरंगाई केली. पोलिसांनी तपास यंत्रणा तत्काळ कामाला लावली असती तर चिमुकली बिजलीचा जीव गेला नसता, असे मत नागपूर पंचायत समितीचे उपसभापती संजय चिकटे यांनी व्यक्त करीत पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले आहे.