न्यायालयीन अवमानना प्रकरणी कारागृह अधीक्षकांना गुरुवारी उत्तर दाखल करण्याचे आदेश

February 24,2021

नागपूर : २४ फेब्रुवारी - उच्च न्यायालयाने अवमाननेप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुप कुमरे यांना गुरुवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे.  या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी अधीक्षक स्वत: न्यायालयात उपस्थित होते. 

सीबीआयद्वारे अटक करण्यात आलेल्या एका आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला. सदर आरोपीला कारागृहातून सोडण्याचे आदेश असतानाही सायंकाळचे पाच वाजल्यामुळे सोडता येत नाही, असे सांगत सोडण्यास नकार देण्यात आला होता. याप्रकरणी कारागृह अधीक्षकांविरोधात अवमाननेचे प्रकरण सुरू आहे. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी अधीक्षकांना आदेश देण्यात आले होते की, तत्काळ रवी शेखर लोंदेकर याला तुरुंगातून सोडण्यात यावे. परंतु, सीबीआयचे अधिकारी हा आदेश घेऊन सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कारागृहात पोहोचले. यावेळी अधीक्षकांनी न्यायालयाचे आदेश मानण्यास नकार दिला. उलट त्यांनी सत्र न्यायालयातून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगत होते. त्यानंतर आरोपींना दुसर्या दिवशी सकाळी सोडण्यात आले. उच्च न्यायालयाने आदेशाची अवमानना झाल्यामुळे दखल घेत कारागृह अधीक्षकांना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. परंतु ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. परिणामी, न्यायालयाने अधीक्षकाच्या माफीनाम्यास नकार दिला. त्यानंतर अवमानना प्रकरण दाखल करीत कारवाई सुरू केली. शुक्रवारी न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. याप्रकरणी अँड. फिरदोस मिर्जा न्यायालयमित्र आहे.