चाकूने वार करून युवकाला ठार मारण्याच्या आरोपाखाली तीन आरोपींना अटक

February 24,2021

नागपूर : २४ फेब्रुवारी - मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमधून दारू पिऊन निघालेल्या तीन युवकांनी ट्राफिक पार्कजवळ एका युवकावर चाकूने वार करून त्याला जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना  रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, खरे टाऊन येथे राहणारे राजकुमार संजय जावा (२४) हे  रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांच्या ऑडी कार क्र. एमएच /डी.व्ही/ ९३९६ ने त्यांच्या घरी खरे टाऊन येथे जात होते. दरम्यान, अलंकार चौकाजवळ असताना एका दुचाकीवर तीन युवक ट्रिपलसीट येत होते. तिघेही रस्त्यातून जाताना जोराजोरात हॉर्न वाजवित शिवीगाळ करीत जात होते. त्यामुळे राजकुमार यांनी त्यांना हटकले. यामुळे चिडलेल्या युवकांनी राजकुमार यांना ट्रॉफिक पार्कजवळ अडविले. त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. युवक दारू पिलेले असल्याने ते अधिकच वाद वाढवू लागले. त्यापैकी एकाने धारदार शस्त्राने राजकुमार यांच्या पाठीवर, छातीवर आणि बरगडीवर वार करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि पळून गेले. त्यानंतर राजकुमार यांनी त्यांच्या वडिलांना फोन करून तेथे बोलावून घेतले. त्यानंतर ते वोक्हार्ट हॉस्पिटल येथे उपचारासाठी भरती झाले. याप्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. होता. पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र आरोपींचा कोणताही सुगावा मिळाला नाही. सीताबर्डी पोलिसांच्या डीबी पथकाने त्यांच्या गुप्त बातमीदारांच्या मदतीने तीनही आरोपींना पकडले. सागर शंकर मसराम (१९),गौरव मनोज कहारे (२१) आणि लक्ष्मण राजेश गोदिया (२0) सर्व रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी यांना अटक करण्यात आली.