अवनी वाघीण शिकार पार्कर्णात कोणत्या नियमांचे उल्लन्घन झाले? सविस्तर उत्तर दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

February 24,2021

नागपूर : २४ फेब्रुवारी - यवतमाळ जिल्हय़ातील अवनी वाघिणीच्या शिकार प्रकरणात कुठल्या नियमांचे उल्लंघन झाले, या संदर्भातील विस्तृत यादी सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने याचिकाकर्ता अर्थ ब्रिगेड फाउंडेशनला दिले.

पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्था अर्थ ब्रिगेड फाउंडेशनकडून याप्रकरणी एसआयटीची (विशेष तपास पथक) मागणी केली होती. याचिकेतून अवनी वाघिणीला गोळी मारणार्या शूटर शफत अली खान, असगर अली खान, उप वनसंरक्षक मुखबीर शेख, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एम. कडू यांच्याविरुद्ध फौजदारी कार्रवाई करण्याचे आदेश राज्य सरकार तसेच एनटीसीएला जारी करण्याची मागणी केली होती. याचिकाकर्त्यानुसार राज्यात वन्य क्षेत्रांमध्ये मानवांचे वास्तव्य वाढले आहे. परिणामी, यवतमाळ येथील पांढरकवडामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. वन विभागाकडून कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता अवनी वाघिणीला दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर तिला गोळी झाडण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. न्यायालयाने केवळ वाघिणीसह तिच्या पिल्लांना बेशुद्ध करून पकडण्याचे आदेश दिले होते. याव्यतिरिक्त अंतिमस्वरूप गोळी मारण्याचे आदेश जारी केले होते. परंतु, २ नोव्हेंबर २0१८ रोजी अवनी वाघिणीला गोळी घालण्यात आली. याप्रकरणी याचिकाकर्त्यांकडून अँड. श्रीरंग भंडारकर व अँड. सेजल लाखानी रेणू यांनी कामकाज पाहिले. तर वन विभागाकडून अँड. कार्तिक शुकुल यांनी बाजू मांडली.