शौक पूर्ण करण्यासाठी दुचाकी चोरणारे दोन आरोपी अटकेत

February 24,2021

नागपूर : २४ फेब्रुवारी - दारू आणि खर्ऱ्याचा  शौक पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर ठेवलेली दुचाकी वाहने चोरून नेणाऱ्या  दोघा कुख्यात चोरट्यांना तहसील पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक करून त्यांच्याजवळून दुचाकी, मोबाईल असा 1 लाख 92 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

शुभम उर्फ शुटर शामराव नेवारे (25) सेवादलनगर भांडे प्लॉट आणि स्वप्निल उर्फ मोनू भीमराव नाईक (32) भांडे प्लॉट अशी या चोरट्यांची नावे आहेत. 

दोघांनाही दारू आणि खर्र्याचा खूपच शौक आहे. हा शौक पूर्ण करण्यासाठी ते काहीही करायला तयार असत. त्यातच त्यांनी दुचाकी चोरण्याचा सपाटा लावला. त्यांनी तहसील येथून सुझुकी मोटरसायकल, सदर येथून हिरो होंडा मोटरसायकल आणि पाचपावली येथून होंडा डिओ दुचाकी चोरल्या होत्या. शुभम उर्फ शटरच्या कारवाया लक्षात घेता त्याच्यावर एमपीडीए अन्वये कारवाई करून त्याला अकोल्याच्या कारागृहात स्थानबद्ध केले होते. चार महिन्यांपूर्वीच तो कारागृहात बाहेर आला. त्यानंतर त्याने पुन्हा चोर्या करायला सुरूवात केली. 

20 फेब्रुवारी रोजी दोघांनीही लोहापूल येथून एका मोबाईल विक्रेत्याची एमएच 31 ईआर 0914 क्रमांकाची ज्युपीटर दुचाकी चोरून डिक्कीत ठेवलेले मोबाईल चोरून नेले होते.त्याचदिवशी रात्रीला ते मोमीनपुरा येथे जेवण करण्यासाठी आले होते. त्यांच्याजवळ एमएच 31 डीएच 3011 क्रमांकाची सुझुकी अॅक्सेस दुचाकी होती. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना कर्नल हॉटेलजवळ पकडले. त्यांची विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांची अंगझडती घेतली असता शुभमजवळ 3 मोबाईल मिळून आले. 

पोलिस ठाण्यात आणून त्यांची विचारपूस केली असता तीनही मोबाईल चोरीचे असल्याचे सांगितले. लोहापूल येथून दुचाकी चोरल्यानंतर दुचाकीच्या डिक्कीत मोबाईल असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांची तीन दिवसांची पोलिस कोठडी घेतली. त्यांच्याजवळ सापडलेली दुचाकी ही त्यांनी एक वर्षांपूर्वी इतवारी येथून चोरल्याची कबुली दिली. कारागृहात असल्याने त्यांना चोरीची वाहने विकता आली नाहीत असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीची 5 वाहने, 8 मोबाईल, 24 रिमोट असा 1 लाख 92 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.