टीव्ही चॅनलवरील चर्चेत वाद विकोपाला गेल्यामुळे चप्पल फेकून मारली

February 24,2021

हैद्राबाद : २४ फेब्रुवारी - न्यूज चॅनेल्सवर होणाऱ्या चर्चा तर आपण नेहमीच पाहत असतो. अनेकदा राजकीय विषयांसंबंधी असणाऱ्या या चर्चांमध्ये सहभागी झालेले पाहुणे एकमेकांसोबत वाद घालताना दिसतात. हे वाद अगदी टोकापर्यंतही जातात. पण आंध्रप्रदेशातील एका तेलुगू चॅनेलवर हा वाद इतका वाढला की चर्चेत सहभागी एका व्यक्तीने भाजपा नेत्याला चक्क चप्पल फेकून मारली.

भाजपा प्रदेश सरचिटणीस एस विष्णू वर्धन रेड्डी या चर्चेत सहभागी होती. लाईव्ह चर्चा सुरु असतानाच अमरावती संवर्धन समितीचे सदस्य के श्रीनिवास राव यांनी रेड्डी यांना चप्पल फेकून मारली.

भाजपाच्या विष्णू वर्धन रेड्डी यांनी के श्रीनिवास राव यांचे टीडीपीसोबत संबंध असल्याचा आरोप केला. यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली. मात्र जेव्हा रेड्डी वारंवार श्रीनिवार राव यांचे टीडीपीसोबत संबंध असल्याचा पुनरुच्चार करु लागले तेव्हा मात्र त्यांचा संताप झाला आणि त्यांनी चप्पल फेकून मारली.

घडलेल्या प्रकारामुळे चर्चेत सहभागी इतरांना आश्चर्याचा धक्काच बसला. तर दुसरीकडे सुरु झालेल्या या प्रकारामुळे अँकरलाही अचानक ब्रेक घ्यावा लागला. भाजपाने या घटनेचा निषेध केला आहे.