ऑइल टँकर उलटल्याने ७ जण जागीच ठार

February 24,2021

नवी दिल्ली : २४ फेब्रुवारी - रस्त्यांवरून वेगाने जाणारे मोठमोठाले ट्रॅक्टर, ट्रॉली किंवा कंटेनर्सच्या बाजूने जाताना अनेकांच्या काळजात धडकी भरते. आणि त्याला कारणही तसंच आहे. या कंटेनर्स किंवा टँकर्समध्ये असलेल्या वजनामुळे चालकाचं थोडं जरी नियंत्रण सुटलं, तरी ही अवजड वाहनं पलटी होण्याची शक्यता असते. किंवा ही वाहनं नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये यमुना एक्स्प्रेस वेवर असाच काहीसा प्रकार घडला आहे. या विचित्र अशा अपघातामध्ये ७ जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री उशिरा घडली आहे. त्यामध्ये एकाच कुटुंबातल्या किमान ५ जणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मथुरेचे वरीष्ठ पोलीस अधीक्षक गौरव ग्रोवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री उशिरा मथुरेहून आग्र्याच्या दिशेने एक ऑईल टँकर वेगाने जात होता. यावेळी टँकरच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टँकर रस्त्याच्या डिव्हायडरच्या दिशेने वळला. असं काही होईल, याची कोणतीही शक्यता वाटत नसलेली एक कार मागच्या बाजूने टँकर आणि डिव्हायडरच्या मधून पुढे जात होती. मात्र, तितक्याच बाजूचा टँकर वळला आणि टँकर आणि डिव्हायडरमध्ये ही कार सापडली.

या भीषण अपघातात कारमध्ये बसलेल्या सर्व कुटुंबीयांसह एकूण ७ जण जागीच ठार झाले असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये एक पुरुष, त्याची पत्नी, त्याची दोन मुले, त्यांचे दोन नातेवाईक आणि कारचालकाचा समावेश आहे. हे सर्वजण हरियाणाच्या जिंदचे रहिवासी होते. मथुरेमध्ये धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी ते जात होते. दरम्यान, ट्रकचालकाविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.