गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील गोंडी शिक्षण देणारी पहिली शाळा सुरु

February 24,2021

गडचिरोली : २४ फेब्रुवारी - गडचिरोली जिल्ह्यातील  शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक गोष्ट घडून आली आहे. धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे ग्रामसभेला प्राप्त अधिकारांचा वापर करून गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा सुरू करण्यात आली आहे.

अंगणवाडी स्तरावरील १५ विद्यार्थ्यांची ही शाळा गोंडी बोलीतून आदिवासी विद्यार्थ्यांना गोटूलचे पारंपरिक संस्कार व शिक्षण देणारे केंद्र ठरणार आहे. शाळेत रूक्ता उसेंडी ही विज्ञान, राजकुमारी कोराम ही कला शाखेतील पदवीधर तथा रिना आतला ही  विद्यार्थ्यांना गोंडी भाषेचे धडे देणार आहे. ‘पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटुल’ या नावाने धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील २४४ (१), ३५० (क) आणि १३ (३) (क) या कलमांमधील तरतुदीनुसार ग्रामसभेला प्राप्त अधिकारान्वये ही शाळा सुरू करण्यात आली.  या शाळेचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी व गोंडी समाज सेवक गणेश हलामी, देवसाय पाटील आतला  उपस्थित होते.