संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ

February 24,2021

मुंबई : २४ फेब्रुवारी - पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेले वनमंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन करत संजय राठोड यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र यावेळी हजारोंच्या संख्येने गर्दी जमवत करोनासंबंधित नियमांचं उल्लंघन केल्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून संबंधितांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. यादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

 “पोहरादेवीत जी हजारोंच्या संख्येने गर्दी जमा झाली होती तसंच नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल त्यासंबंधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कायदा आणि नियमांचं पालन करण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. मग कोणी आपलंही का असेना….मुख्यमंत्री त्यांना सोडणार नाही, सरकार सोडणार नाही. चूक झाली असेल तर कायदा आपलं काम करेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनीयाप्रकरणी वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून अहवाल मागवण्याच्या सूचना मुख्य सचिव संजय कुमार यांना दिल्या आहेत.

संजय राठोड यांनी अटक करुन चौकशी करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. “राठोड यांच्याविरोधात एवढे पुरावे उपलब्ध असताना अद्याप कारवाई का झाली नाही,” असा सवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना रोखण्यासाठी धार्मिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घातली असताना मंत्र्यांनीच ही गर्दी कशी जमवली,” असाही प्रश्न विचारला आहे.