छोट्या चारचाकी वाहनधारकांच्या अडचणींसाठी गडकरींच्या घरासमोर हॉर्न बजाओ आंदोलन

February 24,2021

नागपूर : २४ फेब्रुवारी - कर्ज काढून खरेदी केलेल्या टॅक्सी, लहानमोठ्या चारचाकी वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती वाहतूक आघाडीच्यावतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर गुरुवार, २५ फेब्रुवारी रोजी 'हॉर्न बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन करण्यात येणार आहे.

करोनामुळे सर्व व्यवसाय, धंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे वाहनाधारकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला आहे. संकट काळातील सरकारी व खासगीसह सर्व बँकांच्या कर्जावरील व्याज माफ करावे, वाहनधारकांना वित्तीय कंपन्यांकडून होणारा त्रास थांबवावा, वाहनांवरील सर्व कर्ज करोनाच्या संकटानंतर सहा महिन्यांनी नियमित वसूल करावे, पोलिसांद्वारे होणारी अवैध वसुली तत्काळ बंद करावी, विमा कंपन्यांनी भरमसाठ वाढवलेली विम्याची रक्कम कमी करावी, फास्टटॅगमधून खासगी वाहनांना वगळण्यात यावे, १५ वर्षे झालेली वाहने स्क्रॅपमध्ये टाकण्याचा निर्णय मागे घ्यावा, पेट्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या आधारे निर्धारित करावेत, आदी मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता यशवंत स्टेडियम येथून वर्धा रोडवरील गडकरी यांच्या निवासस्थानापर्यंत हॉर्न वाजवत धडक देण्यात येणार आहे. निवासस्थानासमोर अर्धा तास हॉर्न वाजवण्यात येईल. कर्ज काढून वाहन घेतलेल्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जयकुमार, अभय राखुंडे, आशिष दुरुगकर, संजय जिभे, संजय राऊत, अतुल नसले, राजू लांजेवार, नीलेश माटे, चेतन डोर्लिकर, गौरव राणे यांनी केले आहे.