सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला धक्का

February 24,2021

सांगली : २४ फेब्रुवारी - सांगली महापालिकेत महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. सांगली महापालिकेत सत्तांतर झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी सांगलीच्या महापौरपदी विराजमान झाले आहेत. तर विशाल पाटील गटाचे उमेश पाटील यांना उपमहापौरपद मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला.

सांगली महापालिकेत मागील अडीच वर्षे भाजपची सत्ता होती. महापालिकेत भाजपचे 43 नगरसेवक होतं. परंतु महिला राखीव पदाचा कार्यकाळ संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठी आज निवडणूक पार पडली. राष्ट्रवादीने यासाठी कंबर कसली होती. त्यातच भाजपचे सात नगरसेवक निवडणुकीआधी नॉट रिचेबल झाल्याने चुरस वाढली होती. चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे महापौरपदासाठी दिग्विजय सूर्यवंशी आणि भाजपचे धीरज सूर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. त्यात दिग्विजय सूर्यवंशी यांनी धीरज सूर्यवंशी यांचा तीन मतांनी पराभव केला. दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 मते मिळाली तर धीरज सूर्यवंशी यांना 36 मते मिळाली.

जयंत पाटील यांनी महापालिका महापौर निवडीच्या निमित्ताने सांगलीतील काँग्रेसमधील सर्व गट एकत्र आणले. सांगलीतील काँगेसमधील वसंतदादा घर, मदन पाटील गट, पृथ्वीराज पाटील यांना एकत्र आणत जयंत पाटील यांनी महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर तर काँगेसचा उपमहापौर बसवला आहे. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सूर्यवंशी महापौर तर विशाल पाटील गटाचे उमेश पाटील उपमहापौर बनले. तसंच मदन पाटील गटाला महापालिकेतील महत्त्वाची पदे देण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील देखील राष्ट्रवादीसोबत राहिले.

जयंत पाटलांनी सांगली कॉंग्रेसमधील वेगवेगळे गट आणि राष्ट्रवादीची यशस्वी मोट बांधली. अडीच वर्षांपूर्वी सांगली महापालिका निवडणूक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढवली होती. पण गटातटाच्या राजकारणातून एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रकार झाले होते. यावेळी मात्र सत्तेसाठी सगळे गट एकत्र आले.

दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. कालही त्यांनी काहीही भाष्य करणार नाही, असं सांगितलं होतं. शिवाय संजयकाका पाटील देखील बोलण्यास तयार नाहीत.