जिल्हा कारागृहात दोन परदेशी आरोपींनी विवस्त्र होऊन धिंगाणा घातला

February 24,2021

सातारा : २४ फेब्रुवारी - साताऱ्यातील जिल्हा कारागृहात  दोन परदेशी आरोपींनी विवस्त्र होऊन धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. एवढंच नाहीतर या आरोपींनी उपस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

साताऱ्यातील वाई येथे रो हाऊसमधील कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्या प्रकरणी दोन परदेशी आरोपींना अटक करण्यात आली होती. जर्मनी येथील सर्गीस व्हिक्टर मानका, सेबेस्टीन स्टेन मुलर असं या दोघांची नाव आहे.

या दोघांना सातारा जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले होते. मात्र, अचानक सर्गीस व्हिक्टर मानका आणि सेबेस्टीन स्टेन मुलर या दोघांनी कारागृहातच विवस्त्र होऊन धिंगाणा घातला. दोघांनी विवस्त्र होत कारागृहामधील स्वछतागृहाचे दरवाजे तोडले.

दोन्ही आरोपींनी धिंगाणा घालण्यास सुरुवात केल्यामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली. उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी दोघांना आवरण्यासाठी धाव घेतली. पण धिंगाणा करण्यापासून रोखणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे.

या प्रकरणी आता दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाला आहे. पण, याची तपशील अद्याप समोर येऊ शकली नाही.