संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी औरंगाबादेत घरफोडी

February 24,2021

औरंगाबाद : २४ फेब्रुवारी - कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे औरंगाबाद शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण पहिल्याच दिवशी चोरांनी पोलिसांच्या नाकावर टिचून डॉक्टराचे घर फोडले आहे. तब्बल 100 तोळे सोनं आणि 10 लाख रुपये असा सुमारे 50 ते 70 लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.

शहरातील प्रताप नगर भागात ही घटना घडली आहे. डॉ.सुषमा सोनी (रा.प्रतापनगर, उस्मानपुरा) हे परिवारासह देवदर्शनासाठी बाहेर राज्यात गेले आहे. बंद घर असल्याची संधी साधत चोरट्यानी घराला लक्ष केले. घराचा समोरील दरवाजा तोडून  चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये ठेवलेले सुमारे 100 तोळे सोन्याचे दागिने व रोख 10 लाख रुपये असे सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे.

आज सकाळी जेव्हा घरातील काम करणारे नोकर साफसफाईसाठी आले. तेव्हा हा सर्व चोरीचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, उपयुक्त निकेश खाटमोडे, उपयुक्त दीपक गिर्हेसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनस्थळी दाखल झाले आहेत.

विशेष म्हणजे, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शहरात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत  संचारबंदी लागू कऱण्यात आली आहे. पण संचारबंदीच्या पहिल्याच रात्री धाडसी दरोड्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या बंदोबस्तावरच प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे.