शरद पवारांच्या नाराजीबाबत बोलण्यास संजय राठोडांचा नकार

February 24,2021

यवतमाळ : २४ फेब्रुवारी - पूजा चव्हाण प्रकरणी अडचणीत सापडलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड  यांनी पोहोरादेवी येथे शक्तिप्रदर्शन केल्यामुळे वाद पेटला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, संजय राठोड यांनी याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे.

संजय राठोड हे यवतमाळमधून मुंबईला रवाना झाले आहे.  यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'मी मंगळवारीच कामावर रुजू  झालो आहे. सर्व काही सुरळीत कामकाज सुरू केले आहे. आज कॅबिनेट आहे, त्यासाठी निघालो आहे' असं यावेळी संजय राठोड म्हणाले.

तसंच, शरद पवार यांनी पोहोरादेवी इथं झालेल्या शक्तिप्रदर्शनाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याबद्दल संजय राठोड यांना विचारले असता, 'मी त्यावर काही बोलणार नाही' अशी प्रतिक्रिया दिली.

तसंच, 'लोकांनी कोरोनाबाबत जागृत राहायला हवे, अजूनही लोकं गंभीरपणे वागत नाही' असं म्हणत संजय राठोड यांनी पोहोरादेवी इथं झालेल्या गर्दीबद्दल नाराजी व्यक्त केली.

मंगळवारी दुपारी संजय राठोड यांनी पोहरादेवी दर्शनाच्या निमित्ताने केलेलं शक्तिप्रदर्शन महाविकास आघाडीच्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आवडले नाही. संजय राठोड प्रकरणी शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण एकूणच ज्या पद्धतीने हाताळलं गेलं त्याबाबत शरद पवार समाधानी नाहीत. ते ठाकरे सरकारवर नाराज असल्याचं समजतं. तसंच या प्रकरणी तपास पूर्ण होईपर्यंत संजय राठोड यांनी पदापासून दूर राहावं, असंही शरद पवारांचं मत असल्याचं समजतं.

दरम्यान, कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याने वाशिम पोलिसांनी 10 हजार लोकांच्या विरोधात गुन्हे  दाखल केले आहे. संजय राठोड तिथे दर्शनाला येणार आणि 15 दिवसांनंतर पहिल्यांदाच समोर येणार हे कळताच त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला.