अनंतनाग मध्ये झालेल्या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा

February 24,2021

श्रीनगर : २४ फेब्रुवारी - दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात चार दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. अनंतनागमधील श्रीगुफवारा येथील शलगुल भागातील जंगलात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. 

शोध मोहिमेदरम्यान जंगलात लपून बसेलल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यास जवानांनीही प्रत्युत्तर दिले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. मात्र, लष्कराने याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. काही काळासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. 

या भागात चकमक सुरू असून जंगलात दोन ते तीन दहशतवादी अडकून पडल्याची माहिती सीआरपीएफ दलातील सुत्रांनी दिली. सुरक्षा दलांनी गुप्त माहितीच्या आधारे शलगुल येथील जंगलाला घेराव घालून संशयित दहशतवाद्यांचा शोध सुरू केला होता. जंगलात शोध घेत असताना अचानक लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.