संजय राठोडांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावे - चंद्रशेखर बावनकुळे

February 24,2021

नागपूर : २४ फेब्रुवारी - “वनमंत्री संजय राठोड  यांनी पोहरादेवी इथं जे ओंगळवाणं शक्तीप्रदर्शन केलं ते लाज आणणारं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचं आवाहन धुडकावून लावत गर्दी जमवली. अशी गर्दी जमवून त्यांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केला . मुख्यमंत्री महोदय कार्यकर्त्यांवर नाही तर राठोडांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या”, अशी टीका भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

“राज्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती असताना एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गर्दी टाळण्याचं आवाहन करत आहेत तर त्यांचेच एक मंत्री हजारोंची गर्दी जमवत आहेत. राठोड यांनी गर्दी जमवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अपमान केलाय”, असं बावनकुळे म्हणाले. तर कोरोना संकटात देखील मंत्री संजय राठोड यांनी काल शक्ती प्रदर्शन केलं, यावर मुख्यमंत्री गप्प का?, असा सवालही त्यांनी विचारला.

कोरोनाच्या ऐन संकटात पोहरादेवी इथे हजारो लोकं एकत्र आले. कोरोनाच्या काळात अशी गर्दी करण्याला मनाई असताना देखील शासन प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई केली नाही. मुख्यमंत्र्यां गर्दी करणाऱ्या लोकांवर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले आहेत मात्र केवळ लोकांवर नाही तर राठोडांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

एकतर आरोप झाल्यानंतर राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा होता. परंतु राजीनामा दिला नाही. प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी 15 दिवस लपून बसले आणि बाहेर निघाले तर हजारोंची गर्दी जमवली. राठोड यांच्याकडे नैतिकता उरली नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी.