कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय केले सील

February 24,2021

नागपूर : २४ फेब्रुवारी - एकाचवेळी 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण  झाल्यामुळे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सील करण्यात आले आहे. नागपूर महापालिकेकडून  ही कारवाई करण्यात आली. 

कोरोनाची लागण झालेले सर्वजण महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी आहेत. या सगळ्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर नागपूर महापालिकेने तात्काळ पावले उचलत महाविद्यालय सील केले.

लक्ष्मीनगर झोनचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांनी महाविद्यालया समोर प्रतिबंधित क्षेत्र असल्याचा फलक लावला आहे. सामूहिक प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने आठवडाभरासाठी डॉ. आंबेडकर कॉलेजचा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच महाविद्यालय प्रशासनाला परिसर सॅनिटाइज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातील कोरोनाबाधितांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत.