नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळला

February 24,2021

नागपूर : २४ फेब्रुवारी - गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या घातपाती कारवाया सुरूच असून एटापल्ली तालुक्यातील कोकाटी जंगलात १० किलोचे दोन भूसुरुंग पेरून ठेवले होते. गडचिरोली पोलिसांना नक्षलवाद्यांचा हा कट उधळून लावण्यात यश आले आहे. 

नक्षल विरोधी अभियान राबवत असताना नक्षलवाद्यांनी कोकटीच्या जंगलात दोन इलेक्ट्रिक वायरच्या मदतीने घातपात घडविण्यासाठी १० किलोग्रॅमचे स्फोटक जमिनीत पेरून ठेवल्याचे उघडकीस आले. बॉम्ब शोध नाशक पथकाने घटनास्थळी जाऊन  हे निकामी केले. एका ठिकाणी पोलिसांना एका प्लास्टिक पिशवीमध्ये स्वयंपाकाचे भांडे, भाजीपाला, रेशन, पिण्याचे पाणी असे साहित्य आढळून आले. पोलीस अभियानाने घटनास्थळी जाऊन हे हस्तगत केले. पोलिसांची कुणकुण लागताच नक्षलवादी घटनास्थळावरून फरार झाले.  नक्षलवाद्यांचा कामदार प्रभाकर उर्फ रवी उर्फ पदकाला स्वामी  याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.