बाजारपेठेत मास्क कारवाई अधिक कडक करा : महापौर दयाशंकर तिवारी

February 24,2021

नागपूर : २४ फेब्रुवारी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाद्वारे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. मात्र शहरातील बाजारपेठांमध्ये अजूनही नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येते. अनेक बाजारपेठांमध्ये नागरिक विना मास्कने वावरताना दिसत आहेत. विना मास्क वावरणा-या नागरिकांमुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये मास्क न लावणा-यांविरुद्धची कारवाई अधिक कडक करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. नागपूर शहरात कॉटन मार्केट, बर्डी, गोकूलपेठ, खामला, सक्करदरा, बुधवार बाजार, दहिबाजार पूल बाजार, पारडी, गुलमोहरनगर, सुगतनगर, कमाल टॉकीज, राणीदुर्गावती चौक, जरीपटका आदी ठिकाणी मोठे बाजार भरतात. या बाजारांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या सर्व बाजारांच्या वेळेमध्ये संबंधित झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करण्यात यावी. याशिवाय जे दुकानदार मास्क न लावलेले आढळतील, त्यांच्यावरही कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहे. मजुरांच्या ठिय्यामध्ये त्यांना मास्क वितरित करण्याचे निर्देशही दिले.

 शहरातील कोरोना संसर्गाच्या स्थितीचा महापौर दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी (ता.२४) आढावा घेतला. 

प्रारंभी महापौरांनी दहाही झोनची रुग्णस्थिती, चाचण्यांची संख्या, मास्कची कारवाई आदीबाबत आढावा घेतला. झोनमधील ज्या भागात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे, त्या भागाकडे विशेष लक्ष देण्यात यावे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांची तपासणी व चाचणी करणे, तसेच पॉझिटिव्ह रुग्णांना आवश्यक औषधांचा पुरवठा करण्याबाबत ‘आरआरटी’ला आदेश देण्याचे निर्देश यावेळी महापौरांनी दिले. महापौरांनी कोरोनाची चाचणी प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्रात २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच शांतिनगर आरोग्य केन्द्राचे डॉक्टर विरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. आरोग्य सभापती  विरेन्द्र कुकरेजा, वरिष्ठ नगरसेवक  सुनील अग्रवाल यांनी बैठकीत योग्य सूचना केल्या.