नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांना सुधारीत नियमांनुसार अंमलबजावणी बंधनकारक

February 24,2021

नागपूर : २४ फेब्रुवारी - महाराष्ट्र शुश्रुषा गृह नोंदणी अधिनियम १९४९ अंतर्गत सध्या नागपुरात नोंदणीकृत रुग्णालये संचालित करण्यात येत आहे. विद्यमान अधिनियमाच्या महाराष्ट्र शुश्रुषा गृह नोंदणी नियम १९७३ व त्याअंतर्गत करण्यात आलेल्या सुधारणेसह महाराष्ट्र शुश्रुषा गृह नोंदणी (सुधारीत) नियम २०२१ महाराष्ट्र राज्यात यावर्षी १४ जानेवारीपासून लागू झाला आहे. 

राजपत्रात १४ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध अधिसूचनेच्या अनुषंगाने नागपूर शहरातील सर्व नोंदणीकृत रुग्णालयधारकांना सुधारीत नियमांची अंमलबजावणी करणे अनिवार्य असून त्यान्वये नमूद तरतुदींच्या अधीन वैद्यकीय व्यवसाय पार पाडणे बंधनकारक असल्याचे मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी म्हटले आहे.

सदर नियमात शुश्रुषा गृहाची भौतिक रचना आणि निकष, शुश्रुषा गृहासाठी किमान आवश्यक बाबी, शस्त्रक्रिया गृहासाठी किमान आवश्यक बाबी, अतिदक्षता विभागासाठी किमान आवश्यक बाबी, सुतिकागृहासाठी किमान आवश्यक बाबी, आपात्‌कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णांचा मृतदेह जवळच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करणे, रुग्ण हक्क संहिता आदी बाबींचा समावेश आहे. या बाबींच्या अनुषंगाने सुधारीत नियमांची सविस्तर माहिती राजपत्रात नमूद करण्यात आली आहे.

नोंदणीसाठी व नूतनीकरणासाठी शुश्रुषागृहातील खाटांनुसार शुल्क आकारण्यात येईल. महानगरपालिका वर्ग अ प्लस आणि अ क्षेत्रातील शुश्रुषागृहासाठी ५००० रुपये, ब वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील शुश्रुषागृहांसाठी ४५०० रुपये, क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील शुश्रुषांगृहांसाठी ४००० रुपये, ड वर्ग महानगरपालिका क्षेत्रासाठी ३५०० रुपये, नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत क्षेत्रातील शुश्रुषागृहांसाठी ३००० रुपये आकारण्यात येणार आहे. पाच पेक्षा जास्त खाटा असलेल्या शुश्रुषागृहाला प्रत्येकी पाच वाढीव खाटांबाबत उपरोक्त दरानुसार वाढीव शुल्क आकारण्यात येईल. शुश्रुषागृहाच्या नूतनीकरणासाठी पूर्व नोंदणी किंवा नूतनीकरणासाठी आकारलेल्या शुल्काच्या २५ टक्के वाढीव शुल्कासह शुल्क आकारले जाईल.

कर्मचाऱ्यांचे निकषही ठरवून देण्यात आले आहेत. १० व त्यापेक्षा जास्त खाटांच्या शुश्रुषागृहांसाठी प्रत्येक पाळीत एक कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी, सुतिकागृहांसाठी १० खाटांसाठी प्रत्येक पाळीत एक अर्हताप्राप्त अधिपरिचारिका, तीन खाटांसाठी एक अर्हताप्राप्त परिचारक आवश्यक राहील. शुश्रुषागृहांसाठी भौतिक रचनेचे निकषही ठरवून देण्यात आले आहेत. रुग्ण जीवरक्षणासाठी नियमित तथा आपातकालीन परिस्थितीत प्रत्येक शुश्रुषागृहांकडे इमर्जन्सी औषधांचा ट्रे, एक सक्शन मशीन व अतिरिक्त एक फूट सक्शन मशीन, आठ खाटांसाठी किमान एक ऑक्सीजन सिलिंडर, तथा अतिरिक्त एक ऑक्सीजन सिलिंडर, संबंधित विशेषज्ञ सेवांसाठी आवश्यक ती सर्व उपकरणे व यंत्रसामुग्री, अग्निशामक उपकरणे, ड्रेसिंग ट्रॉली आदींची सोय असणे आवश्यक आहे. तीस पेक्षा जास्त खाटांच्या शुश्रुषागृहात स्वतंत्र प्रवेश क्षेत्र (स्वागत कक्ष), ॲम्थुलेटरी क्षेत्र, निदान क्षेत्र, आंतररुग्ण क्षेत्र व आणीबाणी क्षेत्र असायला हवे.

शस्त्रक्रिया गृहांसाठी ऑपरेशन टेबल, चार सिलिंडरसह भूल यंत्र आणि तद्‌अनुषंगिक उपकरणे, पल्स ऑक्सीमीटर, इलेक्ट्रिक सक्शन मशीन, जनरेटर कनेक्शनसह फूट सक्शन मशीन, इमर्जन्सी मेडिसीन ट्रे, शॅडोलेस लॅम्प, विशिष्ट विशेषज्ञ सेवांसाठी किमान आवश्यक ती यंत्रसामुग्री व उपकरणे, शस्त्रक्रिया गृहाच्या निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा असणे गरजेचे आहे.