नागपुरातील बाजारपेठा व दुकाने दर शनिवारी व रविवारी बंद राहणार

February 24,2021

नागपूर : २४  फेब्रुवारी - नागपूर शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाद्वारे कठोर पावले उचलण्यात येत आहेत. शहरात वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेउन सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी मनपा हद्दीतील सर्व बाजारपेठा व सर्व प्रकारची दुकाने दर शनिवारी व रविवारी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

यामध्ये शहरातील रेस्टॉरंट, हॉटेल आणि खाद्यगृहांचा देखील समावेश करण्यात आला आहे. मात्र ऑनलाईन फुड डिलीव्‍हरीला परवानगी देण्यात आली आहे. यासाठी रेस्टॉरंट, हॉटेल आणि खाद्यगृहांचे किचन सुरू असणार आहेत. यासोबतच मनपा हद्दीतील राज्यस्तरीय/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना परवानगी दिलेले तरणतलाव तसेच सर्व वाचनालय, अध्ययन कक्ष ७ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. आठवडी बाजारातील सर्व प्रकारचे दूकाने बंद राहतील.

सोमवारी (ता. २२) मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपा हद्दीतील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था यासह शहरातील सर्व आठवडी बाजार ७ मार्च २०२१ पर्यंत बंद ठेवणे तसेच शहर सीमेमध्ये धार्मिक, राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर ७ मार्चपर्यंत प्रतिबंध लावण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये अंशत: सुधारणा करुन उपरोक्त आदेश जारी केले आहेत.  

शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था बंद असल्या तरी त्यांना ऑनलाईन स्वरूपात शिक्षण व प्रशिक्षण सुरू ठेवता येणार आहे. शहर सीमेमध्ये धार्मिक, राजकीय सभांसह सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्यात आल्याने सदर कार्यक्रमांना व सभांना मनपा प्रशासनाने पूर्वपरवानगी दिली असल्यास ती रद्द समजण्यात यावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.