नागपुरात १८ प्रतिष्ठानांवर कारवाई

February 24,2021

नागपूर : २४ फेब्रुवारी - नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. २४) शहरातील दहापैकी आठ झोनमधील १८ मंगल कार्यालय, ॲकेडमी, रेस्टारंट व अन्य प्रतिष्ठानांवर दंडात्मक कारवाई केली. कोव्हिडचा वाढता संसर्ग लक्षात घेता गर्दी होउ नये यासाठी प्रशासनाद्वारे जारी करण्यात आलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणा-या प्रतिष्ठानांवर मनपाची कारवाई सुरू आहे. बुधवारी झालेल्या कारवाईमध्ये १ लाख ८२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय झोनस्तरीय उपद्रव शोध पथकाद्वारे ९२ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत एकूण १२ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली त्यापैकी तीन प्रतिष्ठानांमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती, मास्क न लावणे व सोशल डिस्टन्स न पाळले जाण्याचे दिसून आले. यामध्ये एकात्मता नगर येथील जानकी लॉनमध्ये उपरोक्त तिन्ही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर लॉनवर २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. तर छत्रपती चौकातील अर्णव ॲकेडमी आणि वर्धा मार्गावरील रामजी शामजी पोहेवालाकडून सोशल डिस्टन्सिंग व मास्क संदर्भात नियमोल्लंघन झाल्याबद्दल प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

 धरमपेठ झोन अंतर्गत अंबाझरी मार्गावरील डागा लेआउट येथील क्षत्रिय सभागृहामध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती, मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सिंग चे होणारे उल्लंघन लक्षात घेता १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या झोनमधील ८ प्रतिष्ठानांची तपासणी झाली.

 हनुमाननगर झोनमधील ८ प्रतिष्ठानांची तपासणी करीत दोषी आढळलेल्या लॉन व घरगुती लग्न समारंभ स्थळी कारवाई करण्यात आली. नरसाळा येथील प्रिंसेस लॉनमध्ये झालेल्या निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती, मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सिंग चे उल्लंघनाबाबत १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर न्यू नरसाळा येथे घरगुती लग्न समारंभामध्ये मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सिंगबाबत ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

धंतोली झोनमधील १० प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. यापैकी दोघांकडून दंड वसूल करण्यात आला. मानेवाडा मार्गावरील ओझेम बार कडून मास्क व सोशल डिस्टन्सिंग संदर्भात २ हजार रुपये आणि पुरूषोत्तम नगर येथील कीर्ति रेस्टॉरंटवर मास्क व सोशल डिस्टन्सिंग बाबत ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

नेहरूनगर झोन अंतर्गत नंदनवन येथील हॅरीसन लॉन येथे निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती, मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सिंग चे उल्लंघन झाल्याने २५ हजार रुपये, वाठोडा येथील कोहिनूर लॉनमध्ये मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सिंग न होणा-या पालनाबद्दल १० हजार रुपये आणि खरबी येथील लक्ष्मी ढाबा येथे मास्क व सोशल डिस्टन्सिंगबाबत ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. या तीन कारवाईसह झोन पथकाद्वारे १२ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली.

गांधीबाग झोन अंतर्गत जैन भवन व सेवा सदन चौकातील शहजादी लॉन येथे निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती, मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सिंग बाबत अनुक्रमे १५ हजार व १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय ७ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली.

सतरंजीपुरा झोनमधील ४ आणि लकडगंज झोन अंतर्गत १० प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली आहे.

आसीनगर झोन अंतर्गत १६ प्रतिष्ठानांची तपासणी करून एकावर दंड ठोठावण्यात आला. वैशाली नगर येथील विवाह लॉनवर निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती, मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सिंग संदर्भात २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले.

 मंगळवारी झोनमध्ये ५ प्रतिष्ठानांची तपासणी करीत सदर येथील मंगळवारी कॉम्प्लेक्समधील दीशा कम्प्यूटर इन्स्टिट्यूट, स्पेक्ट्रम कम्प्यूटर, अल्करिन इन्स्टिट्यूट व फासी डिझाईन प्रा.लि. येथे सोशल डिस्टन्स व मास्क बाबत प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.