महापौरांची हेल्थ ड्रिंक विकणाऱ्या न्यूट्रीशन क्लबवर धाड

February 24,2021

नागपूर : २४ फेब्रुवारी - नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज सकाळी जुना सुभेदार ले-आऊट, शारदा चौक येथील इम्युनिटी बूस्टर हेल्थ ड्रिंक विकणा-या क्लबमध्ये छापा टाकला. यावेळी सदर क्लबमध्ये कोरोनाच्या दिशानिर्देशांचे पूर्णत: उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. याप्रसंगी महापौरांसमवेत अतिरिक्त आयुक्त  राम जोशी, हनुमाननगर झोनच्या सहायक आयुक्त सुषमा मांडगे आणि उपद्रव शोध पथकाचे जवान होते.

 शारदा चौक येथील एक छोट्याशा खोलीत नागरिकांना दावा करून कोरोना प्रतिबंधक इम्युनिटी बूस्टर काढा व ड्रिंक दिले जात असल्याची माहिती मंगळवारी (२३ फेब्रुवारी) रात्री महापौरांना प्राप्त झाली होती. क्लबचे  सुमित मलिक यांनी काढा घेतल्यानंतर मास्क ही लावण्याची गरज नसल्याचा दावा केला होता. सकाळी महापौरांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, छोट्याशा ४५० वर्ग फुटाच्या खोलीत १५० पेक्षा जास्त लोक जमा असल्याचे दिसून आले. यापैकी कुणीही मास्क घातलेला नव्हता तसेच सामाजिक अंतराचे पालनही करण्यात येत नव्हते. महापौरांनी शासनाच्या दिशानिर्देशांची पायमल्ली उडविताना बघितल्यानंतर त्यांनी उपद्रव शोध पथकाच्या जवानांना दंड लावण्याची सूचना केली. नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकल्यामुळे महापौरांनी त्यांना फटकारले तसेच महापौरांनी अश्या प्रकारे नागरिकांची दिशाभूल करणा-या संस्थेच्या विरुध्द सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले.