चंद्रपूरच्या रामाळा तलावाच्या प्रदूषणासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे मनपा आयुक्तांना निर्देश

February 25,2021

चंद्रपूर : २५ फेब्रुवारी - गोंडकालीन रामाळा तलाव शहरातील सांडपाण्यामुळे प्रदूषित झाल्याचा अहवाल प्रदुषण नियंत्रण मंडळाने जारी केला आहे. तसे पत्र इको-प्रो संस्थेला दिले. मनपा आयुक्तांना त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचना प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिल्या.

सद्यस्थितीत शहरातून निर्मित घरगुती सांडपाणी वाहून नेणारे बंदिस्त गटार चंद्रपूर महानगरपालिकेकडे अस्तित्वात नाही. त्यामुळे काही प्रमाणात अप्रक्रियाकृत घरगुती सांडपाणी तलावामध्ये, लगतच्या नदीमध्ये मिसळल्या जाते. उर्वरित अप्रक्रियाकृत घरगुती सांडपाणी जमिनीमध्ये मुरून भूजलसुद्धा प्रदूषित होत आहे. यावर तातङीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रातून केल्या आहेत.रामाला तलावात येणार्या सांडपाण्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. तलावातील आणि परिसरातील भूजल प्रदूषित होऊनसुद्धा नगर व जिल्हा प्रशासन गंभीर दिसून येत नाही. याकडे नागरिकांनी आता भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत बंडू धोतरे यांनी व्यक्त केले.

ऐतिहासिक रामाळा तलावाचे खोलीकरण करून सौंदर्याकरण करण्याच्या मागणीला घेऊन इको-प्रो च्या वतीने अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे. यासंदर्भात इको-प्रोच्या निवेदनाची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला सूचना दिल्या आहेत. रामाळा तलावाच्या खोलीकरण तसेच सौंदर्याकरणाबाबत वेळोवेळी आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. बैठकीदरम्यान, ऐतिहासिक रामाळा तलाव परिसरालगतच्या नागरी वस्तीतील अप्रक्रियाकृत घरगुती सांडपाणी नाल्याद्वारे तलावामध्ये मिसळते तसेच तलाव भरल्यानंतर अतिरिक्त पाणी ओसंडून लगतच्या झरपट नदीमध्ये मिसळते. त्यामुळे झरपट नदी ही पुढे वाहून इरई नदीत मिसळते, असे स्पष्ट दिसून आले आहे.