शेतीच्या बांधावरून आकाशात बघत असताना तोल गेल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

February 25,2021

भंडारा : २५ फेब्रुवारी - शेतावर गेलेल्या तरुण शेतकर्याचा आकाशात उडणार्या हेलिकॉप्टरकडे बघत असतांना शेतीच्या बांधावरून तोल गेल्याने डोक्याच्या मागील भागास जबर मार लागून मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील खातखेडा गावी घडली. लोमेश हिरामण पदेले (२४)असे मृत पावलेल्या तरुण शेतकर्याचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार, लोमेश हा ८.३0 वाजता रोजच्या प्रमाणे शेतावर गेला. अविवाहित असलेला अमोल गावकर्यांसाठी चेहर्यावर हास्य फुलविणारा म्हणून परिचित होता. मनमिळावू स्वभावाने तो गावात सर्वांना प्रिय असल्याचे गावकरी सांगतात. अमोल अल्पभूधारक शेतकरी होता. कमी जागेतून वर्षभर उत्पन्न काढण्याची त्याची धडपड वाखाणण्याजोगी होती. याचाच परिपाक म्हणून घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे तो शेतावर गेला. सकाळची वेळ होती. अशातच अचानकपणे आकाशात झालेल्या हेलिकॉप्टरच्या आवाजाने त्याच्या भुवया उंचावल्या व बघता बघता उंच बांधावरून पायाचे संतुलन सुटल्याने तोल जाऊन मागच्या बाजूने शेतात पडला. यातच त्याचा जीव गेला. ही बातमी वार्यासारखी गावात पसरताच बघ्यांची एकच गर्दी उसळली. दरम्यान घटनास्थळी माजी जि. प. सदस्य व तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकरराव तेलमासरे यांनी भेट देऊन गावकार्यांसह ग्रामीण रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. पोलिसांना बोलावून कायदेशीर सोपस्कार आटोपण्यात आले. परिसरात शोककळा पसरुन हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मृत्यूपश्चात अमोलच्या मागे आई, भाऊ व वाहिनी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता तरुण युवक मृत्यू पावल्याने पदेले कुटुंबियांवर संकट ओढवले असून प्रशासकीय स्तरावर दखल घेऊन स्व. गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा फायदा मिळवून देण्याची मागणी शंकरराव तेलमासरे सहित जनतेनी केली आहे.