अवैध दारूभट्टीवर धाड टाकून ९२ हजारांचा मुद्देमाल केला जप्त

February 25,2021

भंडारा : २५ फेब्रुवारी - सिहोरा परिसरातील दावेझरी येथे अवैध दारू भट्टीवर सिहोरा पोलिसांनी धाड टाकून ९२ हजार ७00 रुपयाचा माल जप्त केला.

जिल्ह्यातील अवैध धंद्याचा नायनाट करण्याचे उद्दिष्टांनी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी पोलिस दलास अवैध धंद्याबाबत धडक मोहिम राबविण्याचे आदेश निर्गमित केले आहे. त्यावरुन पोलिस स्टेशन सिहोराचे सहायक पोलिस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन सिहोरा परिसरातील दावेझरी येथील जंगल शिवारात दारु भट्टीवर धाड टाकली असता दोन दारुभट्टया मिळून आल्या. 

घटनास्थळावरुन आरोपी बबलु फत्तु भोयर (४0) रा. दावेझरी, सिद्धार्थ अशोक तांडेकर (३६) रा.दावेझरी, नंदलाल अशोक तांडेकर (४0) रा.दावेझरी यांचाकडून ९२ हजार ७00 रुपयाचा माल जप्त करुन आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव मार्गदर्शनात पोलिस स्टेशन सिहोराचे सहायक पोलिस निरीक्षक नारायण तुरकुंडे, पटले, चव्हाण, पत्थे, गजाब यांनी उत्तमरित्या पार पाडली आहे.