तांदुळाने भरलेला ट्रक पोलिसांनी केला जप्त, स्वस्त धान्य दुकानाचा माल खुल्या बाजारात नेत असल्याचा संशय

February 25,2021

यवतमाळ : २५ फेब्रुवारी - दिग्रसवरून आलेला तांदूळ भरलेला चौदाचाकी ट्रक रात्री गस्तीच्या वेळी आर्णी पोलिसांनी पकडून जप्त केला. हा तांदूळ सरकारी स्वस्त धान्य दुकानांचा असून खुल्या बाजारात विकायला जात असल्याचा संशय आहे. रात्री आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव हे आपले सहकारी पोलिस उपनिरीक्षक मसराम, जमादार सतीश चौधर, मनोज चव्हाण, अमित झेंडेकर, विशाल गावंडे, तुषार जाधव हे गस्तीवर असताना ठाणेदारांना याबाबत गुप्त माहिती मिळाली.दिग्रसवरून तांदूळ भरून आर्णीमार्गे जात असल्याची माहिती मिळताच ठाणेदारांनी दिग्रस आर्णी मार्गावर महाळुंगी फाट्याजवळ नाकेबंदी करत पाळत ठेवली. दिग्रस आर्णी सरळ मार्गाने न येता महाळुंगी मार्गाने ट्रक येताना दिसला. पोलिसांनी हा ट्रक क्रमांक एमएच18 बीए0148 ला थांबविले. 

 वाहन चालकास विचारणा केली असता ट्रक दिग्रसवरून आला असून यामध्ये तांदूळ असण्याची माहिती ट्रकचालक अजय गोविंद जाधव (28, वाई गौळ ता. मानोरा, जि. वाशीम) याने दिली. तसेच त्याच्यासोबत दुसरा ट्रकचालक उमेश बाबुसिंग राठोड (पोहरादेवी, ता. मानोरा, जि. वाशीम) यानेही, आम्ही दिग्रसवरून तांदूळ भरून जात आहे आमच्याकडे बिल, बिल्टी नाही, असे सांगितले.

हा तांदूळ रेशनचा असून तो खुल्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयावरून आर्णी पोलिसांनी जीवनावश्यक अधिनियम अंतर्गत ट्रक व तांदळासह दोन्ही चालकांना स्थानबद्ध करण्यात आले. तसेच तांदळाचा ट्रक ज्याचे वजन 45 टन 295 किलो भरले त्याला आर्णीच्या बालाजी जिनिंगमध्ये आणले गेले.

 याची माहिती आर्णी तहसीलदार परशराम भोसले यांना देऊन चौकशीसाठी सांगितले. त्यावरून यवतमाळ येथील पुरवठा अधिकारी सई हिवरकर व आर्णीचे पुरवठा निरीक्षक राठोड आले. त्यांनी पाहणी केली परंतु तांदूळ कुठला आहे याबाबत ते काहीच सांगू शकले नाहीत.गेल्या पंधरा दिवसांत ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी दिग्रस येथूनच आलेला तांदळाचा ट्रक आर्णी पोलिसांनीच 6 फेब्रुवारीला जप्त केला होता. त्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई झाली होती. पंधराच दिवसात तांदळाचा हा दुसरा ट्रक जप्त करण्यात आला. दिग्रसला सरकारी धान्याचा काळाबाजार करणारी टोळी सक्रिय असून ती मोठ्या प्रमाणात खुल्या बाजारात धान्य विक्री करत असल्याचा संशय आहे. दिग्रस महसूल विभागाने याची सखोल चौकशी केली तर मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.